Sangli Samachar

The Janshakti News

न्याय मिळेपर्यंत माघार नाही, मनोज जरांगे यांचा निर्धार !

सांगली समाचार  दि. १२|०२|२०२४

सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांनी वैद्यकीय तपासणी नाकारत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे सरकारला ठणकावले आहे.

सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून त्याची अंमलबजावणी करा, हा कायदा बनण्यासाठी दोन दिवसांत विशेष अधिवेशन घ्या, 57 लाख नोंदी सापडलेल्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकांना शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या, नोंदी सापडलेल्यांच्या याद्या ग्रामपंचायतीवर लावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, हैदराबाद, बॉम्बे गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरा, शिंदे समितीला एका वर्षाची मुदतवाढ द्या, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा व त्याची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी काल शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे.
चार दिवस रात्रंदिवस दौरा आणि कालपासून उपोषणास बसल्यामुळे ते आज दिवसभर पूर्णवेळ झोपून आहेत. घशातील त्रासामुळे त्यांनी आज पत्रकारांशीही संवाद साधला नाही. आरोग्यपथक उपचारासाठी आले असता त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. सरकारकडून काल अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी उपचार सुरू ठेवावे म्हणून विनंती केली होती.

मात्र आपल्या भूमिका वर ठाम राहत जरांगेने 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. दरम्यान शासनाने आरक्षणाच्या बाबतीत खास अधिवेशन बोलवण्याची तयारी केली असल्याने आपण प्रतीक्षा करावी असा निरोप दूतांकरवी जरांगेकडे पोहोचवण्यात आलेला आहे, मात्र या निरोपाला जरांगिनी केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र दिसत आहे.