Sangli Samachar

The Janshakti News

काका थेट बोलले... हा भीष्माचार्य शरपंजरी नाही हे दाखवून दिले !




सांगली समाचार  दि. १२|०२|२०२४

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. निवडणूक आयोगानेदेखील अजित पवार यांचाचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता शरद पवार नेमकं काय करणार ? लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना नव्या निवडणूक चिन्हाला लोकांपर्यंत कसे नेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याच आव्हानावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केले असून हा भीष्माचार्य शरपंजरी नाही, हा संदेश विरोधकांबरोबरच जनतेपर्यंत  पोहोचवला आहे.

आगामी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी लढवलेल्या पहिल्या निवडणुकीवर संदर्भ दिला. ते आज (११ फेब्रुवारी) पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.




नवे चिन्ह लोकांपर्यंत कसे घेऊन जाणार ?

पक्ष आणि चिन्ह गेलं आहे. नवे कोणते चिन्ह मिळण्याची तुम्हाला अपेक्षा आहे. हे नवे चिन्ह लोकांपर्यंत कसे घेऊन जाणार ? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचे उदाहरण दिले. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की, मी पहिली निवडणूक बैलजोडी या निवडणूक चिन्हावर लढवली होती. त्यानंतर आमचं चिन्ह गेलं होतं. त्यानंतर आम्ही चरखा या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. तेही चिन्ह गेलं होतं. त्यानंतर आम्ही हाताचा पंजा या चिन्हावर लढलो होतो.  त्यानंतर मी घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने विचार हा महत्त्वाचा असतो. चिन्ह हे मर्यादित काळासाठी उपयुक्त असते, असे शरद पवार यांनी सांगितले.

“भारताच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते”

राष्ट्रवादी पक्षफुटी आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. “निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने आम्हा लोकांचं चिन्ह काढून घेतलं. आमचा पक्षही दुसऱ्यांना दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला. ज्यांनी पक्षाची उभारणी केली, त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेण्यात आला. यापूर्वी भारताच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. पण ते निवडणूक आयोगाने करून दाखवलं,” असे शरद पवार म्हणाले. तसेच लोक या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा शरद पवारांचा आरोप

याआधी शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप केला. हा आरोप करताना त्यांनी गेल्या १८ वर्षांत ईडीने केलेल्या कारवाईची आकडेवारीदेखील सांगितली.

निवडणुकीसाठी तयार राहा, अजित पवारांचे आवाहन

दरम्यान, दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाही आज पुण्यात एक मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा. पद मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका. मुख्यमंत्रिपदासाठी थोडा धीर धरा, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.