सांगली समाचार दि. १९|०२|२०२४
काँग्रेस पासून फुटून वेगळी चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह घेऊन राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री अशी झेप घेतली. तत्पूर्वी ही काँग्रेस पक्षात असताना त्यांनी विविध मंत्रिपदे व पक्षाची महत्त्वाची पदे सांभाळलेली होती. त्यांचा कामाचा आवाका आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताळण्याचे कसब वादातीत होतं नि आहे. परंतु सत्तेबाहेर राहुन जे राजकारण मोठ्या पवार साहेबांनी केलं त्याला तोडच नाही.
परंतु गेल्या काही वर्षात राजकारणावरची त्यांची कमांड कमी होत गेल्याचे पहावयास मिळाले. याच दरम्यान शरद पवार यांचे बोट धरूनच राजकारणात आलेले मी विविध मोठमोठे पदे भोगलेले त्यांचे पुतणे अजितदादा यांनी अचानक त्यांची साथ सोडून भाजपाशी सोयरीक जुळवली. पक्ष, पक्षाचा झेंडा व चिन्हही हस्तगत केले.
तरीही पराभवाने खचतील ते पवार कसले. त्यांनी पुन्हा नव्याने पक्ष उभारण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्याला तेवढ्याच समर्थपणे पाठिंबादेखील मिळत आहे. त्यात सांगलीतील चार आमदारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
गेल्या वर्षी 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवारांचा हात धरला, तर काही आमदारांनी शरद पवारांसोबत निष्ठा कायम ठेवली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची या वादाला तोंड फुटले होते.
ना पक्ष, ना चिन्ह, काळ कसोटीचा; तरीही 'सिर्फ नाम ही काफी हैं'
अजित पवारांनी सांगली जिल्ह्यात एन्ट्री केली असताना सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चारही आमदार शरद पवारांसोबत ठामपणे उभे राहिले आहेत. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, तासगाव - कवठे महांकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचा समावेश आहे. संकटाच्या काळात पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते ठामपणे त्यांच्यासोबत उभे आहेत.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दिवंगत आर. आर. आबा पाटील यांच्यानंतर जयंत पाटील हे पवारसाहेबांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जयंतराव हे पवारसाहेबांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे.
राष्ट्रवादीचे दुसरे आमदार मानसिंगराव नाईक हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही आहे. नाईक यांना निवडून आणण्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांची मोठी साथ मिळते. नाईक यांना मागील सत्तेच्या काळात अध्यक्षपदाने हुलकावणी दिली होती. परंतु गतवर्षी जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर जयंतरावांनी त्यांना अध्यक्षपदी बसवले आहे. त्यामुळे नाईक हे शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत.
दिवंगत आर. आर. आबा पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून नेतृत्व करत आहेत. पाटील घराण्याचे शरद पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. आबा पाटलांच्या निधनानंतर पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पवार यांनी सुमनताईंना बळ दिले. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष घालून सुमनताईंना दुसर्यांदा आमदार केले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सुमनताई या पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
पलूस-कडेगाव तालुक्यातील नेते आमदार अरुणअण्णा लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादीचे नेतृत्व लाड यांच्याकडे आहे. त्यांची शरद पवार यांच्याशी चांगला घरोबा आहे. डाव्या विचारसरणीचे असताना त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधून मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद उभी केली आहे. त्यामुळे अरुणअण्णा अजितदादांना साथ देणार नाहीत. सध्या जिल्ह्यातील चारही आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आता या निष्ठावंत सोबत्यांना बरोबर घेऊन शरद पवार किती मोठी झेप घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.