Sangli Samachar

The Janshakti News

पुण्यातील जीवघेण्या हल्ल्यानंतर निखिल वागळेंच्या पाठीशी राजकीय क्षेत्रासह सर्व मीडिया उभा !
सांगली समाचार  दि. १०|०२|२०२४

मुंबई - परवा पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, यानंतर निखिल वागळे यांच्या पाठीशी भाजपाविरोधी राजकीय क्षेत्र उभे राहणार हे तर निश्चितच होते. परंतु त्याचबरोबर डिजिटल आणि प्रिंट मीडियातील पत्रकार तसेच विविध संघटनांही उभे राहिल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर आपल्या चॅनलमधून टीका केली होती. त्यामुळे भाजपा समर्थक त्यांच्यावर चिडून होते. वागळे यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून तर वागळे यांच्यावर शाब्दिक मार होतच होता, परंतु आता त्यांच्यावर शारीरिक हल्ला ही करण्याचा प्रयत्न झाला आहे.

वागळे हे परवा "निर्भय बनो" या जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलेले असताना, त्यांच्यावर भाजपा समर्थकांनी जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या समवेत असलेल्या ॲड.  सरोदे, विश्वंभर चौधरी, आणि इतर काही सहकार्य होते. हा हल्ला होताच, ॲड. सरोदे त्याचप्रमाणे काँग्रेसचे काही कार्यकर्ते व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेतली. त्यामुळेच आपला जीव वाचण्याचे निखिल वागळे यांनी म्हटले आहे. 

या प्रकारानंतर शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, नॅशनलिस्ट काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष- माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका केली असून गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामेची मागणी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात असे प्रकार घडत असल्यामुळे राज्यासह केंद्रातील भाजपा नेत्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अंगाशी येत असलेले प्रसंग कसे थोपवायचे याचा विचार आता भाजपा अंतर्गत सुरू झालेला आहे.

दरम्यान निखिल वागळे यांची गाडी तोडफोड तसेच राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन केल्याप्रकरणी ४३ पदाधिकाऱ्यांवर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.