Sangli Samachar

The Janshakti News

8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना जूनपासून मोफत उच्च शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती





सांगली समाचार  दि. १०|०२|२०२४

जळगाव : ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना येत्या जूनपासून मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जळगावात केली. जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहील, असे ते म्हणाले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. शुल्क भरता न आल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. सुसाइड नोटमधून तिने व्यथा मांडली होती. या घटनेनंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी रात्रीतून हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीवर 1 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात राज्यात 2000 प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. ज्या महाविद्यालयात 75 पेक्षा कमी प्राध्यापक असतील त्यांना केंद्राच्या योजना, निधी मिळणार नाही. यासाठी हा निर्णय घेतला आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मागण्यादेखील सकारात्मकतेने सोडवल्या जाणार आहेत. त्यांनाही नियम, निकषानुसार कायम सेवेत घेतले जाईल, असे पाटील म्हणाले.