Sangli Samachar

The Janshakti News

जगातलं हटके स्टेशन, एकही रेल्वेचा कर्मचारी नाही, प्रवासीच तिकीट काढतात अन् स्वच्छताही करतात

सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

जगाच्या कानाकोपऱ्यात अशा गोष्टी घडत असतात. ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. आज अशीच एक घटना आपण पाहणार आहोत. ज्याबद्दल कुणाला काही कल्पना असेल असे वाटत नाही. कारण, जगात असे लोकही असतात जे कोणताही गाजावाजा न करता आपलं काम वर्षानुवर्षे करत आहेत. 

भारतात असंही एक रेल्वे स्टेशन आहे जिथ कोणताही कर्मचारी नाही. तरीही तिथले लोक रोज न चुकता ते स्टेशन स्वच्छ करतात. अन् तिथे तिकीट कलेक्टर बनून स्वत:च तिकीट काढतात. आणि रेल्वेत बसून प्रवासालाही जातात. होय हे खरं आहे. राजस्थानमधील सीकर-चुरु मार्गावर असलेल्या रसीदपुरा खोरी येथे हे स्टेशन आहे. आर्थिक नुकसान होतं असं कारण देत भारतीय रेल्वेने हे स्थानक बंद केले होते. मात्र ते बंद झाल्याने ग्रामस्थांना वाहतुकीत अडचणी येत होत्या. यामुळे त्यांनी हे स्थानक चालवण्यासाठी रेल्वेकडे अनेक विनंत्या केल्या. या स्थानकाच्या साफसफाईपासून तिकीट बुकिंगपर्यंतची सर्व कामे ग्रामस्थ करतात.

2004 मध्ये बंद पडलेले रशीदपुराचे खोरी रेल्वे स्थानक संपूर्ण देशासाठी एक उदाहरण बनले आहे. हे स्टेशन 1942 मध्ये बांधले होते. मात्र वार्षिक उत्पन्न कमी असल्याने रेल्वे विभागाने हे स्टेशन 2004 मध्ये बंद केले. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांना कुठेही जाण्यास त्रास होऊ लागला. लोकांनी रेल्वेकडे अनेक मागण्या केल्या. अखेर रेल्वेने स्थानक पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी घातल्या.

या ठिकाणाहून तीन लाख तिकिटांची विक्री झाली तरच ते सुरू होईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने हे स्टेशन सुरू करण्यात आले. आजही ते गावकरीच चालवतात. इथे येणाऱ्या लोकांची तिकिटे गावकरीच खरेदी करतात आणि मग प्रवास करतात. एवढेच नाही तर स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारीही ग्रामस्थांवर आहे.

रेल्वेने घेतला निर्णय

इतकी वर्षे ग्रामस्थांनी चालवल्यानंतर हे स्टेशन आता हायटेक करून वीस कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय नव्या शासकीय कर्मचाऱ्यांचीही येथे नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रायलाकडून ग्रामस्थान देण्यात आली आहे.