Sangli Samachar

The Janshakti News

आमच्या कार्यकर्त्यांना सत्ता नव्हे काम प्रिय - देवेंद्र फडणवीस

सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

मुंबई  - “राजकारणात काम करत असताना प्रत्येक व्यक्तीला आपल्या भवितव्याची चिंता असते. काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या भवितव्याबाबत अंधार दिसतो. त्यांच्यासमोर भविष्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसचे श्रेष्ठी पराभवापासून काही शिकताना दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते पंतप्रधान मोदींच्या कामामुळे प्रभावित झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या कामाचा झंझावात पाहून इतर पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाबरोबर येऊन काम करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. अशोक चव्हाण असतील किंवा इतर राज्यातील काही नेते असतील, ते सर्व मुख्य प्रवाहात येऊन काम करण्यास इच्छूक आहेत. असे जे नेते भाजपात प्रवेश करत आहेत, त्यांना आम्ही सामावून घेत आहोत”, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली.

पण मग भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे काय?

काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना पद, प्रतिष्ठा मिळत असताना भाजपाच्या मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांना जमिनीवर केवळ संघर्षच करावा लागणार का? असा प्रश्न मुलाखतीत फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “भाजपाचा कार्यकर्ता हाच भाजपाचा आधार आहे. तोच भाजपाची खरी ताकद आहे. भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना माहिती आहे की, त्यांना जीवनात काहीही अक्षरशः काहीही मिळणार नाही. ते आमदार बनणार नाहीत किंवा लोकप्रतिनिधी होणार नाहीत. कारण लोकप्रतिनिधींची संख्या मर्यादीत आहे. तरीही भाजपाचा कार्यकर्ता काम करत राहतो. कारण त्याची काम करण्याची प्रेरणा सत्ता नसून विचार आहे. या कार्यकर्त्याच्या बळावरच भाजपा पक्ष पुढे जात आहे.” 

“आज जेव्हा नवीन लोक पक्षात येत आहेत. तेव्हा कार्यकर्ता असे मानतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी पाहण्यासाठी जे करावे लागेल, ते केले पाहीजे. हे करताना भाजपाच्या कार्यकर्त्यांना कोणतेही दुःख किंवा चिंता वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो काम करण्यासाठी तयार आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी ९० टक्के विकासावर बोलतो

मागच्या निवडणुकीत तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलला होतात, ते लोक आता तुमच्याबरोबर मंचावर उपस्थित राहणार आहेत. मग यावेळी निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये कुणाच्या विरोधात बोलणार? असा प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले की, आम्ही मागच्यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या विरोधात बोललो होतो. याही वेळेला त्यांच्याच विरोधात बोलू. राहिला प्रश्न आमच्याबरोबर असलेल्या लोकांचा, तरत त्यांचे नेतृत्वही याच दोन नेत्यांनी केले होते. तसेच निवडणुकीच्या प्रचारात मी नकारात्मकतेवर बोलत नाही. माझ्या भाषणातील ९० टक्के मजकूर हा विकासावर, आम्ही केलेल्या कामावर आणि आमच्या पुढील दूरदृष्टीवर आधारीत असतो. केवळ १० टक्के राजकारणावर बोलतो. माझे मानने आहे की, ही निवडणूक नकारात्मक बाबींची नाहीच.

आपला मुद्दा समजावून सांगताना फडणवीस म्हणाले, अँटी इन्कम्बन्सीच्या वेळेला नकारात्मक बाबींवर बोलावं लागतं. आमच्यासाठी ही निवडणूक प्रो इन्कम्बन्सीची आहे. त्यामुळे नकारात्मक बाबी बोलण्याची गरज नाही. त्यामुळे आम्हाला विरोधात बोलायची गरजच पडणार नाही. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत काय केले आणि पुढे आम्ही काय करणार आहोत, यावरच आमचा भर असेल.