Sangli Samachar

The Janshakti News

आम्ही सत्तेसाठी हपापलेले कार्यकर्ते नाही - अजितदादा
सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

इस्लामपूर - आम्ही सत्तेसाठी हपापलेले कार्यकर्ते नाही. सत्ता येते जाते, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. बहुजन समाजातील शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी इस्लामपूर येथे राष्ट्रवादी कॉग्रेस (अजितदादा गट) पक्ष कार्यालय उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून चांगले उमेदवार देऊ, सर्वसामान्य जनतेने आशीर्वाद देण्याचे काम करावे असे आवाहन करून, आपण अर्थमंत्री असल्याने इस्लामपूरसह वाळवा तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन अजितदादांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना अजितदादा पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करताना विकसित भारत करण्यासाठी विविध योजना राबविल्या. आम्ही राजकारणात लोकांचा विश्वास संपादन करून जमिनीवरून पाय ठेवून चालण्याची स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील यांची शिकवण अवलंबत आहोत. वाळवा तालुका हा क्रांतीसिंहांचा तालुका आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील, पांडुमास्तर, हुतात्मा किसन अहीर यांनी इंग्रजांना हाकलून लावले. स्वातंत्र्यानंतर क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांनी लोकांना ताकद दिल्याचे अजितदादांनी उल्लेख केला.

इंडिया आघाडीचा उल्लेख करून अजितदादा म्हणाले की इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर असलेली युती तोडून बिहारमध्ये भाजपाचे सरकार स्थापन केले आहे. देशामधील विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्याचा आरोप यावेळी अजितदादांनी केला.

यावेळी क्रीडामंत्री ना. संजय बनसोडे, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, सी. बी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, तालुकाध्यक्ष केदार पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.