Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, अध्यक्षपदी माजी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले

 

सांगली समाचार  - दि. २४|०२|२०२४

मुंबई  - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच निरीक्षण पध्दत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या अध्यक्षपदी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचे सबलीकरण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या यशस्वीतेमुळे उच्च शिक्षणाची गुणवत्ता व पाया यांचे सबलीकरण करण्यासाठी एकछत्री योजना अभियान स्वरुपात राबविण्याकरिता केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही योजना १२ व्या व १३ व्या पंचवार्षिक योजनांपासून राबविण्यात येत आहे. उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी व समानता यावी यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षणा अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य प्रकल्प संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे.

अध्यक्ष म्हणून शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून डॉ.भालचंद्र वायकर (संचालक इनोव्हेशन, इनक्युबेशन ॲण्ड लिकेजेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), डॉ.स्वाती शेरेकर (संचालक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), डॉ.विजय खरे (कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), राहुल म्हात्रे (सहसंचालक, रूसा मुंबई) यांचा समावेश आहे. शासन आदेशात कक्षाच्यावतीने करण्यात येणारी दहा कार्ये विशद करण्यात आली आहेत.

'एनईपी'ची प्रभावी अंमलबजावणी करु : डॉ.येवले

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कक्षाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली ही आनंदाची बाब आहे. माहिती, शिक्षण संवादाच्या माध्यमातून कक्षाचे काम अधिक प्रभावीपणे काम करण्यात येईल. उच्च शिक्षणात 'रिफॉम्स' आणण्याचे दृष्टीने आगामी काळात कार्यरत राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. येवले यांनी व्यक्त केली.