Sangli Samachar

The Janshakti News

टेलरिंग व्यवसायातील कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.

 


सांगली समाचार - दि. २९|०२|२०२४

मुंबई  - टेलरिंग व्यवसायातील अल्प उत्पन्न, कमी शिक्षीत अशा कारागीरांना संघटीत करणे गरजेचे आहे. टेलरिंग व्यवसायातील कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी वाढविण्यासाठी शासनामार्फत शिबिराचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. असंघटित टेलरिंग कामगारांच्या समस्यांबाबत नरिमन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, आयुक्त डॉ. एच. पी. तुंबोरे आदिसह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

मंत्री खाडे म्हणाले की, असंघटित कामगारांना संघटित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असून, जास्तीत - जास्त कामगारांनी येथे नोंदणी करावी. टेलरिंग व्यावसायिकांना संघटित करून त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली असून, त्यांना प्रशिक्षण, व्यवसायासाठी साहित्य, आर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. इतर कामगारांप्रमाणे टेलरिंग कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी श्री. खाडे यांनी केले.