Sangli Samachar

The Janshakti News

घोळ मिटला, जागावाटप ठरले; मविआच्या बैठकीत नेमके काय घडले...

 


सांगली समाचार  - दि. २९|०२|२०२४

मुंबई  - आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडीचे नेते उपस्थित होते. या बैठकीत गेल्या अनेक दिवसापासूनचा घोळ मिटला आहे. जागावाटप ठरले आहे.

आजची बैठक ही निर्णायक झाली. वंचित आघाडीने यावेळी लोकसभेच्या 27 जागेची मागणी केली. पण त्यांनी फॉर्म्युला सांगितला नाही, अशी माहिती बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी दिली. मविआतील कोणत्याच पक्षात मतभेद नाहीत. आघाडीत आता चार पक्ष आहेत. या जागाबाबत वंचित आघाडीचा प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावावर आमची चर्चा पार पडली. वंचितने मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर बैठकीत चर्चा झाली नसल्याचे यावेळी खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

वंचितकडून निवडणुकीची तयारी करण्यात आलेल्या 27 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे सादर करण्यात आला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याची महत्त्वाची मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांना जालनामधून तर, पुणे येथून डॉ. अभिजीत वैद्य यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे नाना पाटोले, पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, वंचित आघाडीचे नेते उपस्थित होते.