| सांगली समाचार वृत्त |
मेरठ - मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०२५
देशासाठी जीवाची पर्वा न करता सीमा सांभाळणाऱ्या जवानावरच स्वतःच्या भूमीवर अन्याय झाला, हा प्रकार संतापजनक ठरला आहे. मेरठ–करनाल राष्ट्रीय महामार्गावरील भुनी टोलनाक्यावर 17 ऑगस्टला घडलेल्या घटनेने संपूर्ण देशभरात रोष पसरला आहे. जवान कपिल सिंह आणि त्यांचा भाऊ शिवम यांना टोल कर्मचाऱ्यांनी निर्दयीपणे मारहाण केली. राष्ट्ररक्षकाचा असा अपमान झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तडकाफडकी कारवाई करत संबंधित कंपनी धर्मसिंह अँड कंपनीवर 20 लाखांचा दंड ठोठावला आणि कंपनीचा करार कायमचा रद्द केला. तसेच पुढील कोणत्याही टोल लिलावात या कंपनीला संधी न देण्याचा निर्णयही घेतला.
कर्तव्यावर जाणाऱ्या जवानाला मारहाण
गोटका गावचे सुपुत्र असलेले जवान कपिल सिंह श्रीनगर येथे सेवेसाठी रुजू होण्यासाठी दिल्ली विमानतळाकडे निघाले होते. मात्र भुनी टोलनाक्यावर लांबलचक रांगेमुळे त्यांनी वेळेअभावी गाडी पुढे सोडावी अशी विनंती केली. परंतु तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी देशसेवेसाठी निघालेल्या या जवानाचा अपमान करत वाद वाढवला. काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि कपिल सिंह यांना खांबाला बांधून लाठी–काठ्यांनी मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर एका कर्मचाऱ्याने त्यांच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. या दृश्याने उपस्थित नागरिकांचे हृदय द्रवले.
नागरिकांचा उद्रेक
भारताच्या सीमा सांभाळणाऱ्या जवानाशी असा वागणूक मिळणे हे राष्ट्रप्रेमालाच धक्का देणारे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. “जो देशासाठी रक्त सांडतो, त्यालाच स्वतःच्या भूमीत अपमानित व्हावं लागतं, हे दुर्दैवी आहे”, अशा शब्दांत स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
धडा ठरावी अशी कारवाई
घटनेनंतर NHAIकडून घेतलेल्या कठोर कारवाईने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली आहे. आता इतर टोल कंपन्यांनीही हे धडा म्हणून लक्षात ठेवण्याची गरज आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिक आणि संस्थेची जबाबदारी आहे, हा संदेश या कारवाईतून अधोरेखित झाला आहे.