| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अलीकडील महासभेत शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यात प्रमुख आकर्षण ठरला त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय. शहर अभियंत्यांच्या प्रस्तावाला सभागृहात एकमुखी मान्यता मिळाली.
महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रातून करण्यात येणाऱ्या रक्त तपासण्यांचे दर निश्चित करण्यासही मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागाच्या प्रस्तावानुसार, अत्याधुनिक मशिनरीद्वारे होणाऱ्या तपासण्यांवर सुसंगत दर आकारले जाणार आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, राहुल रोकडे, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे, उप आयुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, निलेश जाधव, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहा आयुक्त सचिन सांगावकर, अनिस मुल्ला, सहदेव कावडे, नकुल जकाते आदी अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पातील मॉनिटरिंग व ऑटोमेशन व्यवस्था, तसेच जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रमांतर्गत (MRDP) प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठीही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशिष्ट कामांबाबत निविदा रद्द करणे, काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे आणि संबंधित कामांसाठी फेर निविदा प्रक्रिया हाती घेणे, यालाही मंजुरी देण्यात आली.
मालमत्ता कराची वसुली आणि विक्री कार्यपद्धतीबाबत सादर केलेल्या प्रस्तावालाही सभागृहाने मान्यता दिली.
👉 या महासभेत झालेले निर्णय शहरातील सांस्कृतिक जतन, आरोग्य सुविधा, जलपुरवठा सुधारणा आणि आर्थिक शिस्त या सर्वच अंगांनी महत्त्वाचे ठरणार आहेत.