| सांगली समाचार वृत्त |
बीड - बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५
कुंथलगिरी (ता. पाटोदा) येथे दक्षिण भारत जैन सभा वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीमार्फत आयोजित ४३ वे धर्मज्ञान संस्कार शिबीर उत्साहात पार पडले. १५ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत भरलेल्या या शिबिरात महाराष्ट्र व कर्नाटकातून सुमारे १२० तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला.
शिबिराची सुरुवात ध्वजारोहण व जिनमंदिर दर्शनाने झाली. धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधनपर उपक्रमांनी वातावरण भारून गेले. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्त, जबाबदार व राष्ट्रनिष्ठ पिढी तयार करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सेक्रेटरी अजितकुमार भंडे यांनी मुलांना लहानपणापासून योग्य संस्कार व ज्ञान मिळाल्यास ते जीवनात नक्कीच यशस्वी ठरतात, असे मत व्यक्त केले. अध्यक्ष विजय पाटील यांनी "वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्यासारखे अनेक संस्कारित युवक समाजासाठी घडले पाहिजेत," असे प्रतिपादन केले.
संघटक सचिन नवले यांनी धार्मिक शिक्षणाबरोबर लौकिक शिक्षण घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. "मन, मनगट व आरोग्य दृढ ठेवून प्रत्येक काम झोकून देऊन केल्यास यश दुरावणार नाही," असे ते म्हणाले.
या शिबिरात प्रा. एस. डी. पाटील, बाळासाहेब पल्लखे, सुकुमार किनींगे, बा. ब्र. अनिल ठिकणे, राजकुमार चौगुले, अशोक रोजे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजकुमार चौगुले यांनी केले तर संगीताची साथ जिनपाल पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने स्व. वीरशिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची ३७ वी पुण्यतिथीही श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अभयकुमार भागाजे, सेक्रेटरी अजितकुमार भंडे, जॉ. सेक्रेटरी प्रकाश दानोळे, शिबीर विभागप्रमुख अरुण भबिरे, संयोजक प्रदिप मगदूम, सह संयोजक राहुल टकुडगे, तसेच कुंथलगिरी ट्रस्टचे उमंग शहा, अनिल भोकरे, सुभाष मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरातून संस्कारांचे बीज रुजवून सामाजिक व धार्मिक जाणीवेची नवीन उर्जा युवकांमध्ये संचारली.