| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५
आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेची काटेकोर तयारी सुरू झाली आहे. यंदा पोलिस प्रशासनाने विशेष पाऊल उचलत सर्व शासकीय गाड्यांवर कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मिरवणूक मार्गांवरून फिरणाऱ्या या वाहनांमधून गर्दीवर बारीक नजर ठेवली जाणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला.
फल्ले मंगल कार्यालय, सांगलीवाडी येथे झालेल्या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, मोहल्ला समिती, पोलिस मित्र तसेच दोन्ही समाजातील मान्यवर नागरिकांनी सहभाग घेतला. या बैठकीस अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर व उपअधीक्षक विमला एम. उपस्थित होत्या.
अधीक्षक घुगे यांनी सांगितले की, सणांच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करीत सांस्कृतिक वातावरण जपावे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे भान ठेवावे. ध्वनीप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कडक पाळले जाईल. यासाठी ‘नॉईज मीटर’द्वारे थेट नोंदी घेतल्या जातील. मंडळांनी रस्त्यावर व्यासपीठ उभारून मार्ग अडवू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
मिरवणुकीचा ठरलेला मार्ग बदलू नये, असेही ते म्हणाले. गणेशोत्सव आणि ईद हे एकत्र येत असल्याने सामाजिक सलोखा दृढ करण्याची ही मोठी संधी आहे. पोलिस कंट्रोल रूम २४ तास सतर्क राहील. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदत पोहोचवली जाईल. घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंडांचा वापर अनिवार्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत उपअधीक्षक विमला एम. आणि पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विविध मंडळांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी व मागण्या मांडल्या.
दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात परवानग्या मिळविण्यासाठी ‘एक खिडकी’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. पोलिस, महापालिका, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व परवानग्या आता एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
बैठकीस आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, तेजस शहा, वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, संजयनगरचे सुरज बिजली, विश्रामबागचे सुधीर भालेराव, ग्रामीणचे किरण चौगले, विशेष शाखेचे भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल कदम आदी अधिकारी उपस्थित होते.