yuva MAharashtra जमखंडी येथे २५ ऑगस्ट रोजी शांतिसागर महाराज यांची पुण्यतिथी संपन्न होणार

जमखंडी येथे २५ ऑगस्ट रोजी शांतिसागर महाराज यांची पुण्यतिथी संपन्न होणार

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५

दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने 20 व्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट प.पू. १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी जमखंडी जि. बागलकोट येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न होत आहे.
श्री शांतिसागर महाराज यांचे स्मृती चिंतन, अभिवादन, त्यांना अभिप्रेत अशा चरित्र, चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग, तपस्या, संयम या सारख्या सदविचाराचे समाजात अभिसरण व्हावे, त्यांच्या आदेश उपदेशाचा प्रचार प्रसार व्हावा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती समाजाच्या सर्व स्तरावर पोहचावी यासाठी या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते अशी माहिती वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजितकुमार भंडे यांनी दिली.

या महोत्सवासाठी प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी, (नांदणी), प.पू.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी (कोल्हापूर), प.पू.स्वस्तिश्री अभिनव चारुकिर्ती भट्टारक महास्वामी (श्रवणबेळगोळ), प.पू.स्वस्तिश्री देवेंद्रकिर्ती भट्टारक महास्वामी (हुमचा), प.पू.स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक महास्वामी (वरुर) यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. 

या मंगलदिनी पहाटे ६.५५ वा. शांतिद्विप प्रज्वलन, विश्वशांति प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय होणार असून स. ११ वा. अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एष्कात्मता, शांतिसद्भभावना रॅलीचा शुभारंभ बागलकोटचे जिल्हाधिकारी श्री संगाप्पा यांच्याहस्ते व पोलिस अधिक्षक सिध्दार्थ गोयल यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या रॅलीमध्ये वीर सेवा दलाचे हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते, शाखा-शाखा मधून आलेले पथनाट्ये, सामाजिक, राष्ट्रीय विषय व आशय असणारे संदेश देणारे देखावे, वाद्यपथक असणार आहेत. मुख्य समारंभ दुपारी बी.एल.डी.ई. कॉलेज पोलो मैदान जमखंडी येथे संपन्न होणार असून अध्यक्षस्थानी द.भा.जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, स्वागताध्यक्ष वीर सेवा दलाचे चेअरमन विजय पाटील आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी कर्नाटक राज्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, डी.सुधाकर, शिवानंद पाटील, आर.बी.तिमापूर, माजी खा. राजू शेट्टी, आम.राजेंद्र पाटील यड्रावकर, आम.राहुल आवाडे, द.भा.जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हाईस चेअरमन अभिनंदन पाटील, मुख्य महामंत्री अनिल बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संघटक शशिकांत राजोबा, उपाध्यक्ष अभयकुमार भागाजे, जॉ.सेक्रेटरी प्रकाश दानोळे, मुख्य संघटक सचिन नवले, सुनिल पाटील व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवानिमित्त जमखंडी येथे दि. १८ रोजी शांतिकलश रथ प्रवर्तन शुभारंभ, दि.२३ ऑगस्ट रोजी महाविद्यालीन वक्तृत्व स्पर्धा, युवक युवती संमेलन, शांतिसागर, कर्मवीर व वीराचार्य यांचे प्रदर्शन, दि.२४ रोजी पाठशाळा वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, दि. २५ रोजी शांतिदीप प्रज्वलन विश्वशांती प्रार्थना, ध्वजारोहण तसेच शांतिकलशाचे स्वागत होणार आहे.

संयोजन वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, श्री १००८ भ.पार्श्वनाथ दि.जैन मंदिर, श्री धर्मनाथ श्वेतांबर मुर्तीपुजक जैन मंदिर व दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ करत आहेत. या पुण्यतिथी महोत्सवास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सेक्रेटरी अजितकुमार भंडे व संयोजक आण्णाप्पा शिरहट्टी यांनी केले आहे.