yuva MAharashtra “सांगली जिल्हा विकासाचा नवा आदर्श उभा करेल" – उपमुख्यमंत्री अजित पवार”

“सांगली जिल्हा विकासाचा नवा आदर्श उभा करेल" – उपमुख्यमंत्री अजित पवार”

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५

सांगली जिल्हा नेहमीच सक्षम नेतृत्वाला घडवणारा म्हणून ओळखला जातो. राज्याच्या राजकारणात व धोरणनिर्मितीत या जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. विकासाभिमुख लोकप्रतिनिधी आणि सहकार्यशील प्रशासन यामुळे सांगली जिल्हा प्रगतीच्या वाटचालीत अग्रणी ठरत असून, राज्य शासन त्यासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार व आमदार, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कृषि व तंत्रज्ञान यांचा संगम

पवार यांनी सांगलीत "ॲग्री हॅकेथॉन" आयोजित करण्याची सूचना केली. द्राक्ष, डाळिंब, केळी यांच्या आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी रेसिड्यू लॅबची तातडीने उभारणी करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पाणी व खत बचत, तसेच उत्पादनवाढ साधावी, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादक व साखर उद्योगाने या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पायाभूत सुविधा व उद्योग विकास

रांजणी ड्राय पोर्ट, सलगरे मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क, शक्तीपीठ महामार्ग या प्रलंबित प्रकल्पांचा मार्ग काढण्याची हमी पवार यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीचा निधी वेळेवर व गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च व्हावा, अपव्यय होऊ नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.

हरित उपक्रम व नागरी विकास

राज्य शासनाच्या 10 कोटी वृक्षारोपण मोहिमेत सांगली जिल्ह्याने आघाडी घ्यावी, असे आवाहन करताना त्यांनी पर्यावरण संरक्षणासोबत रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण होतील, असे नमूद केले. सांगली महापालिकेसाठी नवीन इमारत, नाट्यगृह, बहुउद्देशीय हॉल, पीएम ई बस चार्जिंग स्टेशन यांसारख्या नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रश्न मार्गी लावण्याचा तत्पर प्रयत्न

बैठकीदरम्यान उपस्थित झालेल्या तातडीच्या प्रश्नांवर त्यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून तत्काळ मार्ग काढण्याची भूमिका घेतली. पूरनियंत्रण, औद्योगिक वाढ, पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, ऊर्जा, शिक्षण, एमआयडीसी, सिंचन या क्षेत्रांवरील आव्हाने व संधी यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे व अन्य अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

लोकप्रतिनिधींचा सक्रीय सहभाग

लोकप्रतिनिधींनी पूरव्यवस्थापन, सौर ऊर्जा प्रकल्प, नगरपंचायतींसाठी इमारतींचा वापर, व्यायाम साहित्य पुरवठा, महापालिकेची इमारत व नाट्यगृह आदी विषयांवर मते मांडली. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी उपमुख्यमंत्र्यांची सूचना होती.

बैठकीचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाला. जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत हजर होते.