yuva MAharashtra कोल्हापूर सर्किट बेंचला सोमवारपासून प्रारंभ : चार न्यायमूर्तींकडे विविध खटल्यांचा ताबा

कोल्हापूर सर्किट बेंचला सोमवारपासून प्रारंभ : चार न्यायमूर्तींकडे विविध खटल्यांचा ताबा

| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५

कोल्हापूर न्यायप्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण उंबरठ्यावर आहे. मुंबई उच्च न्यायालयाची कोल्हापूर सर्किट बेंच येत्या सोमवारपासून (दि. १८ ऑगस्ट) औपचारिकपणे सुरू होत असून, चार न्यायमूर्तींकडे स्वतंत्र खटल्यांचे अधिकार सोपवण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. १४) उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार एच. एम. भोसले यांच्या स्वाक्षरीने याबाबतचा आदेश काढण्यात आला.

खंडपीठ

जुन्या कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीतील कोर्ट रूम क्रमांक एकमध्ये न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांचे खंडपीठ बसणार आहे. त्यांच्याकडे जनहित याचिका, करसंबंधी अपील, फॅमिली कोर्टातील प्रकरणे, लेटर्स पेटंट अपील, गंभीर फौजदारी अपील, मृत्युदंड पुष्टीचे खटले, तसेच पॅरोल–फर्लोशी निगडित अर्ज सुनावणीस येणार आहेत.

सिंगल बेंच

न्यायमूर्ती शिवकुमार दिगे (कोर्ट रूम क्र. २, पहिला मजला, आरसीसी इमारत) यांच्याकडे जामिन अर्ज, अटकपूर्व जामिन, क्रिमिनल रिव्हिजन, फौजदारी रिट आणि मध्यस्थी व सलोखा कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे सोपवली आहेत.

न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर (कोर्ट रूम क्र. ३, दुसरा मजला, आरसीसी इमारत) नागरी पुनरावलोकन अर्ज, सेकंड अपील, कंपन्या कायदा व बँकिंग रेग्युलेशन ॲक्टशी संबंधित खटले तसेच आदेशाविरुद्ध अपीलांची सुनावणी करतील.

न्यायमूर्तींची थोडक्यात माहिती

एम. एस. कर्णिक – नाशिकचे मूळ रहिवासी, पुण्यात कायद्याचे शिक्षण. मार्च २०१६ मध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.

शर्मिला देशमुख – ठाणे लॉ कॉलेजमधून कायदे शिक्षण; जुलै २०२२ पासून उच्च न्यायालयात कार्यरत.

शिवकुमार दिगे – लातूरचे मूळ; जून २०२१ मध्ये नियुक्ती.

एस. जी. चपळगावकर – बीड जिल्ह्यातील रहिवासी; नोव्हेंबर २०२२ मध्ये उच्च न्यायालयात नियुक्त.

प्रलंबित खटल्यांना गती

वरिष्ठ नागरिक, वंचित घटक, तसेच पाच वर्षांहून जुने प्रलंबित खटले यांना प्राधान्याने सुनावणी मिळणार आहे. आरोपी कारागृहात असलेल्या फौजदारी अपिलांना विशेष गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निवडणूक याचिकांसाठी न्यायमूर्ती आठवड्यातील ठरावीक दिवशी सुनावणी करतील.

कर्मचारी वर्ग सज्ज

सर्किट बेंचच्या सुचारू कामकाजासाठी दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी नेमले गेले असून, यातील बहुतांश कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोर्ट रूमची तयारी आणि खटल्यांच्या कागदपत्रांची मांडणी युद्धपातळीवर सुरू आहे.