yuva MAharashtra कोयनेत शंभरी; कृष्णा धोक्याच्या उंबरठ्यावर – प्रशासन सज्ज, नागरिकांना दिलासा

कोयनेत शंभरी; कृष्णा धोक्याच्या उंबरठ्यावर – प्रशासन सज्ज, नागरिकांना दिलासा

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५

कोयना धरणातील पाणी १०० टीएमसीवर पोहोचताच मंगळवारी रात्री ९५ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी झपाट्याने वाढत असून आयर्विन पुलाजवळील पातळी ३५ ते ४० फुटांवर जाण्याचा अंदाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी वर्तविला आहे. केवळ २५ तासांतच नदीची उंची तब्बल ९ फूटाने वाढल्याचे नोंद झाले असून बुधवारी सकाळपर्यंत ३० फूट ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्र्यांचा प्रशासनाशी संवाद

कोयना-वारणा धरणातील वाढत्या विसर्गामुळे सांगलीत निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. २०१९ च्या पुराच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सर्व विभागांनी जबाबदारीने समन्वय साधावा, नियंत्रण कक्ष सतत कार्यरत ठेवावेत, निवारा केंद्रे व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा काटेकोर सूचना दिल्या. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

सुधीरदादांचा दिलासा

सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुरकाठावरील नागरिकांना भेटून "तुमच्या अडचणींकडे प्रशासन दुर्लक्ष करणार नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत," अशी ग्वाही दिली. त्यांनीही नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी व आयुक्तांचा सतर्क दौरा

जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. "आपत्ती मित्र ॲप" च्या माध्यमातून अद्ययावत माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


"आमची यंत्रणाही तत्पर" – पृथ्वीराज पाटील

भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट आदी भागांचा दौरा केला. पाणीपातळी वाढल्यास स्थलांतराची गरज भासू शकते, मात्र त्यासाठी प्रशासनासोबतच त्यांची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने मदतकार्य तत्पर ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.


एकूणच, कोयना धरणातील वाढत्या विसर्गामुळे कृष्णा धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असली तरी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था यांनी संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सज्जता दाखवली आहे.