| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात तब्बल चार दशके प्रभावी कार्य केलेले शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रा. एन. डी. बिरनाळे यांचा यंदा "शिवऊर्जा सन्मान" पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मराठा सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या या समारंभात त्यांचा सत्कार केला जाईल.
इंग्रजी विषयाचे अभ्यासू शिक्षक असलेले प्रा. बिरनाळे हे निवृत्तीनंतरही समाजप्रबोधनाची अखंड धडपड करीत आहेत. भारतीय तत्त्वज्ञान, शिवशाही, शाहूपंथ, फुले-आंबेडकरी विचार, अहिल्याबाई होळकर, साने गुरुजी आणि राष्ट्रीय एकात्मतेचे भान या विविध विषयांवर त्यांनी आतापर्यंत चार हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. शेकडो मानपत्रांची निर्मिती आणि प्रभावी सूत्रसंचालनाद्वारे त्यांनी समाजमनावर ठसा उमटवला आहे.
राज्यातील शिक्षक संघटनांमध्ये व खासगी शिक्षण संस्था संघटनेत तीन दशकांहून अधिक काळ नेतृत्व केलेल्या बिरनाळे यांनी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या सहवासात ‘वीर सेवा दल’ला उभारी दिली. ते केवळ उत्तम वक्ते वा लेखकच नाहीत तर शिक्षण संस्था प्रशासनातील अभ्यासू मार्गदर्शक, जिद्दी संघटक आणि ठाम पुरोगामी विचारवंत म्हणूनही ओळखले जातात.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्यासह अनेक समाजक्रांतिकारकांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अवघड पण महत्त्वाचे काम त्यांनी आयुष्यभर जपले.
प्रा. बिरनाळे यांना मिळणारा हा सन्मान म्हणजे त्यांच्या अथक कार्याचा गौरव असून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.