| सांगली समाचार वृत्त |
नांदणी - शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५
नांदणी (जि. कोल्हापूर) येथील 'माधुरी' या हत्तीला परत आणण्याची मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत होती. या आंदोलनाची दखल घेत गुजरातमधील 'वनतारा' अभयारण्याच्या व्यवस्थापनाने थेट कोल्हापूर येथे येऊन महास्वामींशी भेट घेतली आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिकेला पाठिंबा जाहीर केला. तसेच, माधुरीच्या आरोग्यासाठी नांदणीतच वैद्यकीय सुविधा पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे माधुरीच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता प्राणी संरक्षण संघटना पेटा इंडियाने नव्या निवेदनाद्वारे पुन्हा विरोधाची भूमिका घेतली आहे.
पेटाच्या मते, महाराष्ट्रात सध्या हत्तींसाठी आवश्यक तितक्या आधुनिक आणि सुसज्ज वैद्यकीय सोयी असलेले केंद्र उपलब्ध नाही. १६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातही माधुरीच्या ढासळत्या प्रकृतीकडे लक्ष वेधून तिच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे नमूद करण्यात आले होते. जसे माणसांना वृद्धापकाळात किंवा आजारपणात विशेष उपचार, विश्रांती आणि मानसिक आधाराची गरज असते, तसेच हत्तींनाही भौतिक व सामाजिक गरजा असतात. वनतारामध्ये गेल्यावर माधुरीला प्रथमच दुसऱ्या हत्तीचा सहवास मिळाला असल्याचाही उल्लेख पेटाने केला.
संस्थेच्या मते, माधुरीला दीर्घकाळापासून तज्ज्ञ पशुवैद्यकीय काळजी आणि इतर हत्तींचा सहवास आवश्यक आहे. तिच्या साखळ्यांमधून मुक्ततेसह उच्च दर्जाचे उपचार आणि पुनर्वसनाची संधी देण्याच्या न्यायालयीन निर्णयाला ते पूर्ण पाठिंबा देतात. सध्या माधुरी गंभीर स्तरावरील संधिवात, पायांतील संसर्ग आणि मानसिक तणावाशी झुंज देत आहे.
३३ वर्षांच्या एकांतवासानंतर आणि कठीण सिमेंटच्या जमिनीवर राहिल्यामुळे तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. न्यायालयाने तिला नव्या जीवनाची संधी देण्याचा निर्णय घेतला असला, तरी भूतकाळात ती मानसिक अस्वस्थतेमुळे आक्रमक झाल्याचे आणि एका प्रमुख स्वामीजींचा जीव गेला असल्याची नोंदही करण्यात आली आहे. पेटाच्या म्हणण्यानुसार, माधुरीसाठी अशा जागेची गरज आहे, जिथे ती मोकळेपणाने फिरू शकेल, पाण्यात व्यायाम करून पायांना आराम देऊ शकेल आणि तिच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार होऊ शकतील.