| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५
भाजपाच्या सांगली शहर जिल्हा संघटनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मध्य मंडळ आणि सांगली उत्तर मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची औपचारिक घोषणा नुकतीच करण्यात आली. या वेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
या उत्साहवर्धक सोहळ्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचा संचार केला. नव्या कार्यकारिणीत अनुभवी नेते आणि नवतरुण नेतृत्व यांचा समतोल साधण्यात आला आहे. यातून पक्षाच्या भविष्यासाठी सक्षम आणि गतिमान संघटनात्मक पायाभरणी घडत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, ज्येष्ठ नेते मोहन वाटवे, मध्य मंडळाचे अध्यक्ष अमित देसाई, उत्तर मंडळाचे अध्यक्ष राहुल नवलाई यांच्यासह विविध विभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत पक्षशक्तीचा खरा कणा कार्यकर्तेच असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, बूथस्तरावरील कार्य हे पक्षाच्या वैचारिक विस्ताराचे मूळ असून, कार्यकर्त्यांमधील समर्पण हेच पक्षाच्या यशाचे रहस्य आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी नव्या कार्यकारिणीकडून पक्षनिष्ठा आणि कार्यदक्षतेची अपेक्षा व्यक्त केली. ही केवळ नेमणूक नसून भाजपाच्या विश्वासाचा ठेवा असून, प्रत्येकाने ती पूर्ण जबाबदारीने सांभाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी जयघोषांनी सभागृह दुमदुमून गेले.