yuva MAharashtra मालेगाव स्फोट खटल्याचा निकाल : तब्बल १७ वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त

मालेगाव स्फोट खटल्याचा निकाल : तब्बल १७ वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त

| सांगली समाचार वृत्त |
मालेगाव - गुरुवार दि. ३१ जुलै २०२५

२००८ साली मालेगावमध्ये घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल अखेर विशेष एनआयए न्यायालयाने दिला आहे. तब्बल १७ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर, सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि शंभराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी भाजप खासदार आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. तपास यंत्रणांनी मृत्युदंडाची मागणी करत प्रकरण न्यायालयात सादर केले होते.

साध्वी प्रज्ञा यांची भावना व्यक्त

निर्णयानंतर भावनिक प्रतिक्रिया देताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, “मी केवळ सहकार्याच्या भावनेतून तपास यंत्रणांपुढे हजर झाले होते, पण मला अन्यायकारकरीत्या अटक करण्यात आली. कोठडीत मला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला.” बोलता बोलता त्यांना अश्रू अनावर झाले.

त्यांनी पुढे सांगितले, “मी संन्यासी जीवन जगले, पण समाजाने मला संशयित नजरेने पाहिले. भगव्या वस्त्रावर आतंकवादाचा शिक्का मारण्यात आला. मात्र आज न्यायसंस्था त्या कलंकाचा पूर्णविराम ठेवलाय. आज भगव्याचा आणि हिंदुत्वाचा सन्मान परत मिळालाय.”

साध्वी प्रज्ञा यांनी न्यायालयीन लढाईनंतर समाजातील झालेल्या बदनामीबाबतही नाराजी व्यक्त केली. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, “सहआरोपी राकेश धावडे यांचा मुलगा केवळ वडिलांचे नाव असल्यामुळे शाळेत प्रवेशास नकार दिला गेला. नावे बदलल्यावरच प्रवेश मिळाला. ही सामाजिक बेदिली कोण भरून काढणार?”

प्रकरणाचा मागोवा

या प्रकरणात वापरलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्याच नावावर नोंदवलेली होती, त्यामुळे त्यांना संशयित ठरवण्यात आले होते. त्यांच्यावर स्फोट कटात सक्रिय सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तेव्हापासून अनेक वर्षे न्यायालयीन लढाई चालू होती. सध्या त्या जामिनावर बाहेर असून लोकसभेच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत.

आता विशेष एनआयए कोर्टाने या सर्व आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष जाहीर केले असून, या प्रकरणाला १७ वर्षांनी न्यायाचा शेवट लाभला आहे.