yuva MAharashtra मराठी युवकांसाठी नव्या युगाचा रोजगार प्रारंभ; राज्य सरकारकडून ॲप आधारित वाहतूक सेवा लवकरच

मराठी युवकांसाठी नव्या युगाचा रोजगार प्रारंभ; राज्य सरकारकडून ॲप आधारित वाहतूक सेवा लवकरच

              फोटो सौजन्य : चॅट जीपीटी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. ३० जुलै २०२५

राज्यातील तरुणांसाठी रोजगाराचे नवीन दालन खुले होणार असून, महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने ॲपवर आधारित नव्या प्रवासी वाहन सेवेला लवकरच सुरुवात होणार आहे. खासगी कंपन्यांच्या मक्तेदारपणाला छेद देत, आता रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईकसारख्या सुविधा थेट सरकारी हस्तक्षेपातून मराठी तरुणांसाठी खुले होणार आहेत.

या सेवेला 'जय महाराष्ट्र', 'महा-राईड', 'महा-यात्री' किंवा 'महा-गो' अशा काही संभाव्य नावांपैकी एक दिले जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मान्यतेनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल, असा त्यांचा विश्वास आहे.

'महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी' तसेच 'मित्र' संस्थेच्या सहभागासह या ॲपची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. पारदर्शकता, सुरळीत सेवा आणि नागरिकहित यांचे भान ठेवत हे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत, मराठी युवक-युवतींना व्यवसायासाठी विशेष आर्थिक पाठबळ दिले जाणार असून, मुंबै बँक तसेच विविध सामाजिक महामंडळांच्या मदतीने कर्जाची सोय केली जाईल. ११ टक्के व्याजाची रक्कम अनुदानाच्या रूपात शासन परत देणार असल्याने, हे कर्ज जवळजवळ बिनव्याजी ठरणार आहे.

सरनाईक यांनी असेही स्पष्ट केले की, केंद्र सरकारच्या ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमावलीचे अंतिम मसुदा तयार झाला आहे. सध्या बाजारात कार्यरत असलेल्या खासगी ॲप कंपन्या चालक व प्रवाशांवर अनावश्यक आर्थिक भार टाकत असल्यामुळे सरकारी हस्तक्षेपाची गरज भासू लागली आहे.

५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात या प्रकल्पाबाबत एक उच्चस्तरीय बैठक होणार असून, त्यात आमदार प्रवीण दरेकर, संबंधित तांत्रिक तज्ज्ञ व अधिकारी उपस्थित राहतील. त्या बैठकीत या सरकारी ॲपच्या अंतिम रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे.