| सांगली समाचार वृत्त |
छ. संभाजीनगर - बुधवार दि. ३० जुलै २०२५
राज्यातील सुमारे 630 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, सध्या आयोगाकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित यंत्रणेमुळे एकाचवेळी सर्व संस्थांमध्ये निवडणुका घेणे अशक्य आहे. परिणामी, निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जाणार असून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा आयोगाचा विचार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी (दि. २९) पार पडलेल्या आढावा बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधील निवडणुकीसंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते.
राज्यात गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोना संकट, प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया यांमुळे हा विलंब झाला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयोगाने हालचाली गतीमान केल्या असून निवडणूक यंत्रणेच्या क्षमतेचा तपशीलवार आढावा घेतला जात आहे.आयोगाच्या प्राथमिक योजनेनुसार, सर्व निवडणुका एकत्रित न घेता त्या हळूहळू, नियोजित पद्धतीने घेतल्या जातील. सुरुवात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांपासून होणार असून त्यानंतर महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाईल.
निवडणुकीसाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासनिक तयारीसाठी आयोगाला अधिक कालावधीची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात आयोग सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त वेळ मिळवण्यासाठी अंतरिम अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली.