| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १३ जुलै २०२५
दक्षिण भारत जैन सभा म्हटली, की दोन दैदिप्यमान व्यक्तिमत्त्वांची नावं आदराने घेतली जातात – दिवाण बहादूर आण्णासाहेब लठ्ठे आणि दिवाण बहादूर आण्णा फड्याप्पा चौगुले. १४ जुलै हा दिवस या दोन्ही नेत्यांच्या स्मृतीने उजळून निघतो.
१८७२ मध्ये या दिवशी बेळगावात जन्मलेले आण्णा फड्याप्पा चौगुले आणि १९३७ मध्ये याच दिवशी मुंबई इलाख्याचे अर्थमंत्री म्हणून निवडले गेलेले आण्णासाहेब लठ्ठे – या दोघांनी जैन समाजासाठी आणि व्यापक समाजासाठी इतिहास घडवला.
गुरे राखणारा पोरगा ते दिवाण बहादूर
फड्याप्पा आणि गंगाबाई या साध्या, अनपढ पण धर्मनिष्ठ शेतकरी दांपत्याच्या घरात जन्मलेले आण्णा चौगुले यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. गुरे राखताना एका प्रसंगी दोन अपरिचितांनी त्यांच्यातील बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांच्या आयुष्याला ही घटना वळण देणारी ठरली.
दहाव्या वर्षी शाळेचा प्रवास सुरू झाला आणि आठ वर्षांतच ते मॅट्रिक झाले. संस्कृत विषयात बी.ए. पूर्ण करून त्यांनी कोल्हापूरच्या लक्ष्मीसेन महाराजांच्या आशीर्वादाने आणि माणिकचंद जव्हेरी यांच्या साहाय्याने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी त्यांनी स्वतः बोर्डिंग अधीक्षकाचेही काम केले.
न्यायव्यवस्थेतून सामाजिक सेवेकडे वाटचाल
बेळगावच्या न्यायालयात ५२ वर्षे प्रभावी वकीली करत त्यांनी नाव, प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळवली. पण त्यांचे खरे कार्य होते समाजसेवेत. नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, मुंबई विधी मंडळाचे सदस्य या पदांवर त्यांनी कार्य करताना प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा आदर्श घालून दिला.
दक्षिण भारत जैन सभेचा पायानामदार लठ्ठे यांच्यासोबत त्यांनी दक्षिण महाराष्ट्र (भारत) जैन सभेची स्थापना केली. लठ्ठे यांनी सभा स्थापनेचा ठराव मांडला, तर चौगुले यांनी मोफत जैन शिक्षणाची पाठशाळा सुरू करण्याची संकल्पना मांडली. दोघांनी मिळून सभेचे संविधान तयार केले आणि संघटनेचा पाया घातला.१९०७, १९११ व १९१९ मध्ये चौगुले सभेचे महामंत्री होते. अनेक अधिवेशनांत अध्यक्ष, स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व दिले. ‘जिनविजय’ (कन्नड आणि मराठी) या मुखपत्रांचे संपादन करत त्यांनी धार्मिक विचारांचा प्रसार केला.
धर्म, आस्था आणि बांधिलकी
रत्नकरंड, वसुनंदी श्रावकाचार, आदिपुराण यांसारख्या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. बेळगावात दोन जैन मंदिरे उभारून त्यांनी धर्मसंवर्धनासाठी योगदान दिले. शिखरजी, श्रवणबेलगोळसारख्या तीर्थक्षेत्री त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. युरोपीय लोकांनाही या तीर्थस्थळी अनवाणी दर्शन करण्यास भाग पाडून त्यांनी धर्मनिष्ठेचा आग्रह धरला.
परंपरेचा वारसा पुढे चालवणं हीच आदरांजली
निधनाच्या काही काळ आधी त्यांनी सभेचे तरुण नेते चंद्रकांत कागवाड यांना सामाजिक वारसा पुढे चालवण्याचे आवाहन केले होते. “लठ्ठे गेले, मीही या वाटेवर आहे – आता हे कार्य तुमच्या हाती,” असे उद्गार तेव्हा त्यांनी काढले. त्यांच्या कुटुंबातील अनेकजण न्यायव्यवस्थेत आणि वैद्यकीय क्षेत्रात पुढे आले. त्यांच्या जीवनकार्याची आठवण आजही प्रेरणादायी आहे.
चौगुलेसाहेबांनी जो विश्वास आणि संस्कारांचा वारसा निर्माण केला, तो पुढील पिढीने जपणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
---
प्रा. एन. डी. बिरनाळे
महामंत्री (सांगली)
दक्षिण भारत जैन सभा