| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - मंगळवार दि. ८ जुलै २०२५
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे राज्याच्या राजकारणात मोठं वळण ठरतं आहे. याच दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मराठीसह स्थानिक भाषांवर ठाम भूमिका मांडली असून, भाजपसाठी ही बाब काहीशी अडचणीची ठरू शकते.
संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केलं की, भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्व भाषा या राष्ट्रभाषाच आहेत. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांनी स्थानिक भाषेत शिक्षण घ्यावं, ही संघाची नेहमीची भूमिका आहे. स्थानिक बोलीत शिकणं हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतं, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय वादात संघाची ही प्रतिक्रिया लक्षणीय मानली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने पूर्वी लागू केलेल्या हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. मराठीला बळ देण्याच्या दृष्टीने, राज्यात हिंदी सक्ती नको, तर मराठीला शैक्षणिक पातळीवर अनिवार्य करावं, अशी जोरदार मागणी ठाकरे गट आणि मनसेने केली होती. हाच मुद्दा दोन्ही पक्षांनी एकत्र आणला आहे.
या घडामोडी दरम्यान, संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत देशभरातील विविध प्रांतांतील प्रचारक सहभागी झाले होते. मणिपूरमधील शांतता स्थापनेच्या हालचाली, सीमावर्ती सुरक्षेचे प्रश्न आणि सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या उपक्रमांवर सखोल चर्चा झाली. संघाच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या १७,६०९ स्वयंसेवकांपैकी ४० वर्षांहून अधिक वयाच्या ८,८१२ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. देशभरात १ लाखांहून अधिक ठिकाणी सामाजिक ऐक्य बैठका पार पडल्या आहेत.
दिल्लीतील या बैठकीत सुनील आंबेकर आणि प्रांत प्रचारक अनिल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये ठोस निर्णय घेण्यात आले नसले तरी, महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आलं आहे.