| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - बुधवार दि. ३० जुलै २०२५
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तब्बल शंभर दिवस उलटले, तरी आजही हल्ल्याच्या सूत्रधारांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केंद्र सरकारवर थेट निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले. "विरोधकांनी जाब विचारला, की लगेच नेहरू-इंदिरा गांधींचं नाव पुढे केलं जातं. किती दिवस जुने इतिहास वाचवत राहणार? आताची जबाबदारी तुमची आहे," असे ते संतप्तपणे म्हणाले.
'ऑपरेशन सिंदूर'विषयी चर्चेत भाग घेताना त्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला. पण पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नसल्याची आठवणही करून दिली. "एकीकडे युद्धविरामाचं श्रेय ट्रम्प घेतात, तर दुसरीकडे आपलंच सरकारही तशीच भाषा बोलतं. मग आजही पाकिस्तानकडून हल्ले का सुरू आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.विशाल पाटील पुढे म्हणाले, "आपल्या माणसांना देशात मारलं जातं, आणि गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीच ठोस कारवाई होत नाही, हे अपयश नाही का? आजवर कुणी जबाबदारी घेतली नाही, तरीही विरोधकांनी सरकारसोबत उभं राहण्याचं बळ दिलं. मात्र आता उत्तर देण्याची वेळ तुमची आहे."
त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं – संरक्षण खात्यासाठी असलेल्या खर्चाच्या वाटपावर. "अर्थसंकल्पात ९.५ टक्के वाढ असूनही, तो निधी प्रामुख्याने पगार व निवृत्तिवेतनातच खर्च केला जातो. संरक्षणासाठी प्रत्यक्षात लागणारा निधी कमी पडतोय. संसदीय समितीच्या शिफारशी नुसार तो किमान तीन टक्के असावा, पण आपण दोन टक्क्यांवरच अडकलो आहोत," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
"दहशतवाद्यांनी आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं... त्यांना भारतात आणून शिक्षा देणं गैर आहे का? सरकारला आता स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल," अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.