| सांगली समाचार वृत्त |
जम्मू - शनिवार दि. ७ जून २०२५
काश्मीरच्या पर्वतरांगेत, चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. या वेळी त्यांनी विशेष वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत नवा इतिहास रचला. हा भव्य पूल जम्मू आणि काश्मीरमधील बक्कल व कौरी गावांना जोडतो. सुरुवातीला १९ एप्रिल रोजी उद्घाटन ठरवण्यात आलं होतं, परंतु प्रतिकूल हवामानामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आजच्या सोहळ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची विशेष उपस्थिती होती.
अभियांत्रिकीचा अद्वितीय नमुना
३५९ मीटर उंचीवर उभारलेला हा कमानीचा पूल आर्किटेक्चरल व चमत्कार मानला जात आहे. १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च पूल हा आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर उंच आहे. ३०,००० टन स्टीलपासून बनवलेला हा पूल ८ रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपांना आणि २६० किमी/तास वेगाच्या वाऱ्यांनाही सहज तोंड देऊ शकतो. ४० टन टीएनटी स्फोट सहन करण्याची क्षमताही या पुलात आहे. पुलाचे आयुष्य १२० वर्षे असून त्यावरून ताशी १०० किमी वेगाने रेल्वे धावू शकते.
काश्मीरसाठी प्रगतीचा नवा मार्ग
हा पूल केवळ अभियांत्रिकी पराक्रमच नाही तर जम्मू आणि श्रीनगरमधील दळणवळणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यामुळे कटरा-श्रीनगर प्रवासात २-३ तासांची बचत होणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प, ज्याची लांबी २७२ किमी असून अंदाजे ४३,७८० कोटी रुपयांचा खर्च त्यावर झाला आहे, तोही आज राष्ट्राला समर्पित करण्यात आला. या प्रकल्पात एकूण ३६ बोगदे (एकूण ११९ किमी) आणि ९४३ पूल समाविष्ट आहेत.
शांततेचा आणि विकासाचा नवा सूर
अलीकडे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांततेचा श्वास घेता येतो आहे. ईद उल अधा २०२५ पूर्वी देशाला मिळालेलं हे मोठं भौगोलिक आणि तांत्रिक यश, एक नवा अध्याय सुरू करत आहे.