yuva MAharashtra विशाळगडावर उरूस, कुर्बानी व सणांना बंदी; हिंदू संघटनांचा जल्लोष

विशाळगडावर उरूस, कुर्बानी व सणांना बंदी; हिंदू संघटनांचा जल्लोष


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ८ जून २०२५ 

कोल्हापूर जिल्हा प्रशासन व राज्य सरकारने विशाळगडावर उरूस, कोणताही सण, उत्सव आणि बकऱ्याच्या कुर्बानीला यापुढे परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे चौकात साखर व पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.

विशाळगडावर मुस्लिम सरदार मलिकरेहानच्या नावाने भरविण्यात येणाऱ्या उरूसाला आणि त्याच्या थडग्याला धार्मिक महत्त्व देण्यास विरोध करत हिंदू एकता आंदोलनाने ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस अधिकाऱ्यांनी विशाळगडावर कोणत्याही स्वरूपाच्या धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देणार नाही, असा स्पष्ट निर्णय घेतला.


राज्य सरकारमधील वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गडावरील पवित्रतेचा भंग होऊ नये, यासाठी बकऱ्याच्या कुर्बानीला परवानगी नाकारण्याची भूमिका घेतली. हिंदू एकता आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले की, “मलिकरेहान किंवा अफजलखान यांच्या थडग्यांचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही. अफजलखानाच्या दर्ग्यावर बुलडोजर फिरलाच, तसा मलिकरेहानच्या थडग्यावरही तोच न्याय व्हायला हवा.”

या निर्णयाचे स्वागत करत अनेक शिवभक्तांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रकाश चव्हाण, सोमनाथ गोटखिंडे, मनोज साळुंखे, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, केदार खाडिलकर, रवींद्र वाढवणे, शुभम चव्हाण, प्रदीप कांबळे, विकास आवळे, संजय बापू तांदळे, अनिकेत आंब्रळे, शुभम खोत, संदेश खोत, अजय काकडे, अरविंद यातनाळे, गजानन माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.