yuva MAharashtra आता आयटीआयमध्ये एआय, ड्रोन, इ. आधुनिक अभ्यासक्रमांची सुविधा

आता आयटीआयमध्ये एआय, ड्रोन, इ. आधुनिक अभ्यासक्रमांची सुविधा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ८ जून २०२५ 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नव्या युगाच्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक प्रगत आणि कालसुसंगत कौशल्ये मिळावीत यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) अभ्यासक्रमासह आणखी सहा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नव्या अभ्यासक्रमांमध्ये खालील विषयांचा समावेश :

  • विद्युत वाहन व्यवस्थापन
  • इंडस्ट्रिअल रोबोटिक्स
  • थ्रीडी प्रिंटिंग
  • ड्रोन तंत्रज्ञान
  • सोलर तंत्रज्ञ
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)


हे अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. सध्या आयटीआयमध्ये वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, वायरमन यांसारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांची शिकवण दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळत असल्या, तरी झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात ही अभ्यासक्रम मर्यादित वाटू लागले आहेत.

नव्या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल, ड्रोन ऑपरेशन व त्यांची दुरुस्ती, सौर ऊर्जा व्यवस्थापन, रोबोटिक तंत्रज्ञान तसेच थ्रीडी प्रिंटिंगसारख्या आधुनिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या अभ्यासक्रमांची घोषणा केली.

सांगली जिल्ह्यातही नवा शैक्षणिक अध्याय सुरू होण्याची तयारी

सांगली जिल्ह्यातील शासकीय व खासगी आयटीआय संस्थांमध्ये सध्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. येथे सुमारे २५ अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्यातील बहुतांश पारंपरिक आहेत. ‘कॉस्मेटोलॉजी’ व ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रामिंग’ हे काहीसे आधुनिक अभ्यासक्रम अपवाद आहेत. आता नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रमही लवकरच सुरू होणार असले, तरी प्रवेश अर्जामध्ये सध्या तरी या नव्या अभ्यासक्रमांचा उल्लेख झालेला नाही. मात्र, लवकरच त्याचा समावेश होईल, अशी अपेक्षा आहे.