| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १० जून २०२५
सांगली महानगरपालिकेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ७ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी त्यांनी १० लाख रुपयांची लाच मागितल्याची माहिती समोर आली असून, तडजोडीनंतर ७ लाख रुपये ठरले होते.
तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती थेट एसीबीकडे दिली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली. ठरलेल्या ठिकाणी रक्कम स्वीकारताना साबळे यांना अटक करण्यात आली. सध्या त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर सांगली महापालिकेच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, पारदर्शक प्रशासनाची जोरदार मागणी होत आहे. दरम्यान, साबळे यांच्या निवासस्थानी व कार्यालयात एसीबीकडून झडती घेतली जात असून तपास अधिक खोलवर सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यभरात लाचखोरीविरोधात एसीबीकडून कठोर पावले उचलली जात असून, यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकारी आणि लिपिक लाच घेताना अडकले होते. आता सांगलीतील ही कारवाई, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट करत आहे.