| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २९ जून २०२५
नॉटिंगहमच्या मैदानावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने विजयी सूर मारताना, कर्णधार स्मृती मानधनाने जबरदस्त खेळी करत क्रिकेट इतिहासात आपलं वेगळं स्थान पक्कं केलं आहे.
भारत-इंग्लंड महिला टी२० मालिकेच्या पहिल्याच लढतीत स्मृतीने ११२ धावांची भेदक खेळी करत इंग्लिश गोलंदाजांची झोप उडवली. तिच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांचा मजबूत डोंगर उभारला.
सामन्याच्या सुरुवातीलाच शेफाली वर्मा स्वस्तात माघारी परतली, पण त्याचा फारसा परिणाम भारताच्या धावसंख्येवर झाला नाही. कारण दुसऱ्या टोकाला स्मृतीने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख समतोल राखत अर्धशतक गाठलं — केवळ २७ चेंडूत! तिच्या कारकिर्दीतील हे ३१ वे अर्धशतक ठरले.
अर्धशतक गाठल्यानंतर स्मृतीने आपली गती अधिक वाढवत मैदानावर चौकार-षटकारांचा वर्षाव सुरूच ठेवला. तिच्या फलंदाजीने प्रेक्षकांना खेळातील रोमांच अनुभवायला दिले.
या कामगिरीने स्मृतीने टी२० क्रिकेटमधील एक वेगळाच विक्रम नोंदवला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्याच सामन्यात अशा पद्धतीने शतक झळकावणारी ती एकमेव फलंदाज ठरली आहे.