yuva MAharashtra सांगलीत 'भक्तियोग'चा नाद घुमणार; पाच लाखांहून अधिक नागरिकांची सहभागाची तयारी

सांगलीत 'भक्तियोग'चा नाद घुमणार; पाच लाखांहून अधिक नागरिकांची सहभागाची तयारी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २० जून २०२५

21 जून – जागतिक योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात एक आगळावेगळा उपक्रम साकार होणार आहे. जिल्हा परिषद, विश्व योगदर्शन केंद्र आणि चितळे डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, 21 जून रोजी जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजार ठिकाणी ‘भक्तियोग’ हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायाच्या भजनाच्या तालावर योगाभ्यासाचा संगम साधत, एक नवा अध्यात्मिक आरोग्यदायी प्रयोग घडवण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये पाच लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून, भविष्यात 'भक्तियोग' हा सांगली जिल्ह्याचा ओळखचिन्ह ठरेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मुख्य कार्यक्रमाचे आयोजन सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व केंद्रे एकाच वेळी, एकाच तालावर आणि आभासी माध्यमातून एकत्रितपणे सहभागी होतील. पारंपरिक पोशाखातील सहभागी, प्रशिक्षित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते ८.४५ या वेळेत योगासने करतील.


धोडमिसे यांनी सांगितले की, "योगाच्या शारीरिक आणि मानसिक लाभाला भक्तीचा स्पर्श देत, एकात्म आरोग्य आणि अध्यात्माचा संदेश देणारा हा ‘भक्तियोग’ उपक्रम, समाजाला नवसंजीवनी देणारा ठरेल." या योग महोत्सवात शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, उद्योगसमूह आणि व्यापारी केंद्रे यांचाही सहभाग असून, सर्व ठिकाणी एकसंध तालावर भक्तिभावपूर्ण योगप्रकार सादर केले जाणार आहेत.

या विशेष उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उपस्थित नागरिकांना आणि सहभागी केंद्रांना त्यांचे फोटो यु-ट्युब व अन्य डिजिटल माध्यमांवर अपलोड करता येतील, अशी माहितीही देण्यात आली.

फक्त सांगलीकरच नव्हे, तर राज्याबाहेरील आणि देशाबाहेरील नागरिकांनाही या उपक्रमात डिजिटल माध्यमातून सहभागी होता येईल. या अनोख्या आणि सामूहिक आरोग्यचळवळीमध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन एक इतिहास घडवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.