yuva MAharashtra जैन समाजाच्या प्रगतीसाठी नवे पाऊल – मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

जैन समाजाच्या प्रगतीसाठी नवे पाऊल – मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

फोटो सौजन्य : फेसबुक वॉलवरुन

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ जून २०२५

जैन समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुंबईतील मल्होत्रा हाऊस येथे "जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे" कार्यालय सुरु करण्यात आले असून, याचे उद्घाटन मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या अध्यक्षा आभा राणी सिंह प्रमुख उपस्थित होत्या.

मंत्री लोढा म्हणाले की, जैन समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे. महामंडळाच्या कार्यक्षम आणि परिणामकारक व्यवस्थापनासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्यांनी महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांचा दौरा करत २२ जिल्ह्यांमध्ये कार्यालये सुरु केली आहेत. या प्रवासादरम्यान जैन समाजासाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्याचे कार्यही त्यांनी हाती घेतले आहे.

केंद्र शासनामार्फत जैन महामंडळाला आवश्यक निधी मिळवून देण्याची हमी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षा आभा राणी सिंह यांनी दिली. त्यांनी सांगितले की, इतर सरकारी महामंडळांच्या तुलनेत जैन महामंडळाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि सरकारी योजनांविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम सातत्याने करत आहे.