yuva MAharashtra आयुष व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक अंमली पदार्थ प्रतिबंध दिन उत्साहात साजरा

आयुष व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक अंमली पदार्थ प्रतिबंध दिन उत्साहात साजरा



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - शुक्रवार दि. २७ जून २०२५

२६ जून २०२५ रोजी आयुष व्यसनमुक्ती उपचार व मानसिक आरोग्य सेवा केंद्र, मिरज येथे जागतिक अंमली पदार्थ प्रतिबंध दिन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्साहात साजरा करण्यात आला.

आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. दिपाली जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी समाजातील वाढत्या व्यसनाच्या समस्येवर प्रकाश टाकत पुनर्वसनाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी सांगितले की, "व्यसन हे फक्त व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंब, समाज आणि राष्ट्रावर होतो. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे."

कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित परिस फाउंडेशनचे पुनर्वसन मानसतज्ञ डॉ. अजित पाटील यांनी व्यसनमुक्तीसाठी मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी व्यसनाच्या मूळ कारणांवर आणि त्यावरील मानसोपचार पद्धतींवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात चालणाऱ्या सकारात्मक बदलांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. चमन शेख यांनी "व्यसन व त्याचे दुष्परिणाम" या विषयावर सखोल माहिती दिली. यानंतर केंद्रातील काही व्यसनमुक्त व्यक्तींनी आपल्या यशोगाथा सांगत उपस्थितांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमात परिस फाउंडेशनचे प्रेरणादायी व्हिडिओ व यशोगाथा ऐकवण्यात आल्या. प्रशांत बेळंकी यांनी पथनाट्यातून समाजात व्यसनमुक्ततेचा प्रभावी संदेश दिला. शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत बेळंकी, प्रवीण सर, केंद्राचे समुपदेशक, कर्मचारी व इतर मान्यवरांचे योगदान लाभले.