yuva MAharashtra वारकरी संत परंपरेच्या विचारसरणीचे धागे विरळ होत आहेत - डॉ. तारा भवाळकर

वारकरी संत परंपरेच्या विचारसरणीचे धागे विरळ होत आहेत - डॉ. तारा भवाळकर

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २९ जून २०२५

संत परंपरेने समाजातील अंधश्रद्धेला आव्हान देत जनजागृती केली, जाती-धर्मांच्या सीमा ओलांडणारा एकतेचा धागा तयार केला. परंतु, आज हे विचारसरणीचे धागे विरळ होत चालले असून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर इशारा डॉ. तारा भवाळकर यांनी दिला.

सांगलीत आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ आणि ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ ही त्यांची दोन नवी पुस्तके या वेळी प्रकाशीत झाली. कार्यक्रमात अंनिसचे हमीद दाभोलकर, संत साहित्य अभ्यासक सचिन परब, पुरोगामी कार्यकर्ते सुभाष पाटील, डॉ. अनिल मडके आणि राहुल थोरात यांची उपस्थिती होती.

जातिभेदाला आव्हान देणारे संत साहित्य

भवाळकर म्हणाल्या, एकेकाळी समाजरचनेत जातीनुसार भूमिका ठरत होत्या. मात्र संतांनी या भेदाभेदांवर प्रहार करत खऱ्या अर्थाने लोकजागृती केली. पंढरपूरचा विठ्ठल हा केवळ श्रद्धेचा नव्हे, तर मेहनती श्रमिकांचा प्रतिनिधी होता. उच्चवर्णीय असूनही संत एकनाथांनी भारुडाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न स्पष्टपणे मांडले.

संत साहित्य: मराठी समाजाचे संस्कृतिक आधारस्तंभ

संतांचे विचार हे केवळ धार्मिक नव्हते, तर सामाजिक सुधारणांचे मार्गदर्शक होते. त्यांच्याच लेखनातून मराठी भाषा आणि समाजजीवनास ऊर्जा मिळाली. संत साहित्याने छत्रपती शिवाजी महाराजांनाही प्रेरणा दिली, असे मत परब यांनी मांडले. आजच्या काळात अशा थेट सामाजिक टीका करण्याचे धाडस कमी झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हमीद दाभोलकर यांनी सांगितले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार संत परंपरेशी जोडलेला होता. त्यांना अंनिसच्या कार्यपद्धतीतही ही परंपरा जपायची होती. वारकरी परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे समावेशकता – देव नाकारणाऱ्यांनाही स्वीकारण्याची तिची तयारी.

वारी मार्गावर बदलते स्वरूप व त्यामागचे प्रश्न

डॉ. भवाळकर यांनी आजच्या वारी मार्गावरील बदलांकडे लक्ष वेधले. वारकरी तत्त्वज्ञान स्वावलंबनाचे असून कोणाकडून काही न घेण्याची शिकवण देणारे आहे. मात्र आज वारी मार्गावर उभारली जाणारी अन्नछत्रे, व्यसनमुक्तीचे फलक, मांसबंदीचे आग्रह हे मूळ परंपरेत बसत नाहीत. ही वारसा भांडवलशाहीच्या दिशेने झुकत असल्याची चिन्हे आहेत, असे त्यांनी नमूद केले.

सूत्रसंचालन: राहुल थोरात
उपस्थित मान्यवर: महावीर जोंधळे, अरविंद पाटकर व इतर साहित्यवंत