| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० मे २०२५
"भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी..." या गदिमा लिखित ओळी आजच्या अस्थिर काळात पुन्हा आठवत आहेत. सांगली जिल्ह्यातील सुमारे ३० हजार जवान देशाच्या सीमेवर अथवा विविध ठिकाणी सज्ज आहेत. त्यापैकी अनेकांनी सुटी अर्ध्यात सोडून पुन्हा सीमेवर हजेरी लावली आहे.
पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात रोषाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावरही अतिरेक्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय सुरक्षा दलांनी या हल्ल्याचा बदला घेतला, तर पाकिस्तानकडूनही त्यांच्या सैन्याला प्रत्युत्तर देण्यास मोकळीक देण्यात आली. त्यामुळे सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून युद्धजन्य परिस्थितीची छाया जाणवू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक जवानांना तातडीने परत बोलावण्यात आले. सुटीवर घरी आलेले जवान आता पुन्हा ड्युटीवर रवाना होत आहेत. त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यांत चिंता, तर हृदयात अभिमान दिसून येत आहे. कुटुंबीय निरोप देताना गलबलले; पण सैनिक मात्र निर्धाराने देशसेवेसाठी निघाले.
सीमेवर असलेल्या आणि परत गेलेल्या जवानांचे कुटुंबीय आता अधिकच चिंतेत आहेत. सोशल मीडियावर सैनिकांच्या भावनिक निरोपाचे व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. मात्र, हे जवान निडरपणे देशाच्या संरक्षणासाठी पुढे सरसावत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखले जाणारे सांगली जिल्हा, आज वीर जवानांचा जिल्हा म्हणूनही गौरवले जाते. आजवर जिल्ह्यातील १६० जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. ७० हून अधिक सैनिकांना शौर्यपदकांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये एक महावीरचक्र, एक शौर्यचक्र आणि ३१ विविध सैनिकी पदकांचा समावेश आहे.
माजी सैनिकांची मोठी फौजही सज्ज
जिल्ह्यात आजघडीला सुमारे १४,६७५ माजी सैनिक आहेत, तर ६,०९९ जवानांच्या विधवा कुटुंबांची देखील जबाबदारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांभाळते. कर्तव्यावर असलेल्या ३० हजार जवानांमध्ये अनेकजण सध्या प्रत्यक्ष सीमेवर सेवा देत आहेत.
त्यांच्या घरच्यांचे डोळे आज सीमेवर खिळले आहेत. वीरपत्नी, आई-वडील, लहान मुले आणि नातेवाईक – सर्वजण एकच प्रार्थना करत आहेत – आपल्या लाडक्या जवानांचे रक्षण व्हावे. आणि हेच त्यांच्या देशप्रेमाचे जिवंत उदाहरण आहे.