yuva MAharashtra आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास १५ मे पर्यंत मुदतवाढ - पालकमंत्र्यांच्या निर्णयाने समाधान !

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास १५ मे पर्यंत मुदतवाढ - पालकमंत्र्यांच्या निर्णयाने समाधान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ मे २०२५

उन्हाळी हंगाम सन २०२४-२५ करिता मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री यांचे अध्यक्षतेखाली माहे मार्च २०२५ मध्ये मंत्रालय मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली होती. आरफळ कालवा (सांगली जिल्हाकरिता) तारळी प्रकल्पातून कोपर्डे लिंक द्वारे उन्हाळी हंगामा करता ०.९९ TMC एवढी तरतूद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आरफळ कालवा सांगली जिल्ह्याकरिता सिंचन आवर्तन दि. २६/०३/२०२५ पासून सुरु करण्यात आले होते. आरफळ कालव्याचे सांगली जिल्ह्यातील एकूण लाभक्षेत्र १५६०० हेक् टर इतके असून त्यामध्ये पलूस, कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्यातील लाभक्षेत्राचा समावेश होतो. एकूण लाभक्षेत्रापैकी ११००० हेक्टर एवढे लाभक्षेत्र तासगाव तालुक्यातील आहे. आरफळ कालव्याची एकूण लांबी कि.मी. ८६ ते १९२ म्हणजेच १०६ किलोमीटर इतकी आहे.

तासगाव तालुक्यातील ढवळी, तासगाव, नागाव कवठे, कुमठे या शेवटच्या भागातील क्षेत्राकरिता उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाण्याची आवश्यकता भासत आहे. याकरिता तारळी प्रकल्पातून सुरू असलेले उन्हाळी आवर्तन सुरू ठेवावे अशी लाभधारकांकडून मागणी प्रामुख्याने होती.


सांगली जिल्ह्यातील आरफळ कालव्याच्या शेवटच्या भागातील लाभधारकांकडून पाण्याची मागणी होत असल्यामुळे या बाबी लक्षात घेऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दूरध्वनीद्वारे चर्चा केली. या चर्चेच्या अनुषंगाने मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. अतुल कपोले तसेच तारळी प्रकल्प व आरफळ प्रकल्पाचे क्षेत्रीय अभियंते यांना दूरध्वनीद्वारे सूचना देऊन तारळी प्रकल्पातून पुरेशा प्रमाणात आरफळ कालवा (सांगली जिल्हा) करीता तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आरफळ कालव्याच्या लाभधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.