yuva MAharashtra महावितरणची 'लकी डिजिटल ग्राहक योजना' – दुसरा लकी ड्रॉ ७ मे रोजी !

महावितरणची 'लकी डिजिटल ग्राहक योजना' – दुसरा लकी ड्रॉ ७ मे रोजी !

फोटो सौजन्य  : गुगल इमेजेस

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ मे २०२५

ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या 'लकी डिजिटल ग्राहक योजने'अंतर्गत दुसरा लकी ड्रॉ ७ मे २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या ड्रॉमधून राज्यातील प्रत्येक उपविभागासाठी प्रथम क्रमांकाच्या ६५१ विजेत्यांना स्मार्टफोन देण्यात येणार आहे. याशिवाय दुसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन अशा १३०२ विजेत्यांना स्मार्टफोन व तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्यांना स्मार्ट वॉच भेट म्हणून दिली जाणार आहेत.

या योजनेचा पहिला ड्रॉ ७ एप्रिल २०२५ रोजी पार पडला होता, ज्यामध्ये निवड झालेल्या विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पुढील ड्रॉ जून महिन्यात घेतला जाणार आहे.


महावितरणने ही योजना मुख्यत्वे ऑनलाईन वीज बिल भरणा करणाऱ्या 'लघुदाब' वर्गातील ग्राहकांसाठी लागू केली असून, १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा अधिक महिने ऑनलाईन बिल भरलेल्या ग्राहकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.

विशेष बाब म्हणजे ही योजना अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांनी १ एप्रिल २०२४पूर्वीच्या मागील एक वर्षात (०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४) एकदाही ऑनलाईन बिल भरणा केलेला नव्हता. अशा ग्राहकांना डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यासाठी हे एक उत्तम संधी आहे.

महावितरणकडून वीज बिल भरण्याच्या डिजिटल सुविधांसाठी संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप आणि विविध पेमेंट गेटवेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना देयकावर ०.२५% सूटही दिली जाते. सध्या राज्यातील सुमारे ७०% पेक्षा अधिक ग्राहक वीज बिल ऑनलाईन भरत आहेत, आणि हे प्रमाण वाढवण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, QR कोड, एनईएफटी, RTGS आदी डिजिटल माध्यमांचा वापर करून सलग तीन महिने वीज बिल भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.