| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ मे २०२५
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 ते 27 मे दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. या कालावधीत ते नागपूर, नांदेड आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमध्ये विविध शासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात भूमिपूजन, उद्घाटन समारंभ, जनसभा आणि विशेष व्याख्यानांचा समावेश आहे.
नागपूर दौरा - 25 आणि 26 मे
25 मे रोजी रात्री 9:30 वाजता अमित शहा नागपूरमध्ये दाखल होतील. दुसऱ्या दिवशी, 26 मे रोजी सकाळी 11 वाजता, जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे 'स्वस्ति निवास' पंथागाराच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता कामठी तालुक्यातील चिंचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या स्थायी कॅम्पसचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या इमारतीच्या ई-उद्घाटनाचा कार्यक्रम होईल.
नांदेड दौर्यातील विविध उपक्रम
नंतर ते दुपारी 3 वाजता नांदेडमध्ये दाखल होतील. येथे वसंतराव नाईक चौकात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. यानंतर, विद्युत नगर चौकात विविध कार्यक्रम, कुसुम ऑडिटोरियममध्ये बैठक, आणि नाना-नानी पार्क, इंडस्ट्रियल एरिया येथे सायंकाळी 5:15 वाजता उद्घाटनाचे कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी 6:30 वाजता नवा मोडा ग्राउंड येथे जनसभा होणार आहे. रात्री 10 वाजेच्या सुमारास ते मुंबईत पोहोचतील.
मुंबईतील कार्यक्रम - 27 मे
27 मे रोजी सकाळी 10:30 वाजता अमित शहा श्री लक्ष्मी नारायण मंदिर, माधव बाग येथे मंदिराच्या 150व्या वर्धापनदिन समारंभात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई विद्यापीठातील सर कावसजी जहांगीर सभागृहात विशेष व्याख्यान होतील. दुपारी 2:30 वाजता ते दिल्लीच्या दिशेने प्रयाण करतील.
हा दौरा केवळ विकासाच्या दृष्टीने नव्हे, तर राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींनाही गती देणारा ठरण्याची शक्यता आहे.