| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ मे २०२५
राज्यातील पारंपरिक ‘डीएड’ महाविद्यालयांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात तब्बल १,४०५ महाविद्यालये कार्यरत होती, मात्र २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी केवळ ५७१ महाविद्यालये शिल्लक राहणार आहेत. मागील १२ वर्षांमध्ये सुमारे ८५० महाविद्यालयांनी प्रवेश संख्या न मिळाल्याने दरवाजे बंद केले आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने येत्या २०२९ पूर्वी सर्व ‘डीएड’ महाविद्यालये बंद करण्यात येणार असून, त्यांच्या जागी चार वर्षांचा इंटिग्रेटेड ‘बीएड’ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. मात्र, २०२५-२६ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया होणार असून २२ मेपासून ‘डीएड’साठी प्रवेश सुरू होणार आहेत.
पूर्वीचं आकर्षण आता राहिलं नाही
कधीकाळी विज्ञान आणि वाणिज्य शाखेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी शिक्षक बनण्यासाठी ‘डीएड’चा पर्याय निवडत असत. वर्षाला तीन लाखांहून अधिक अर्ज मिळायचे आणि प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असायची. परंतु आता परिस्थिती बदलली असून ४५-५५ टक्के गुणधारक विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमात रुची वाटत नाही.
शासनाकडून शिक्षक भरतीस विलंब, तर खासगी संस्थांमधील नोकरीसाठी भरमसाट देणगी (२० लाखांपर्यंत) यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अनेकांनी शिक्षक बनण्याची आशा सोडून इतर रोजगाराच्या दिशेने वाटचाल केली आहे.
प्रवेशांची दयनीय स्थिती
सध्या राज्यात ‘डीएड’साठी ३० हजार जागा उपलब्ध आहेत, तरीही केवळ २० हजार विद्यार्थीही अर्ज करत नाहीत. त्यामुळे अनेक संस्थांनी महाविद्यालये बंद केली आहेत. शिक्षण खात्याच्या माहितीनुसार, यंदा ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चालू वर्षीची आकडेवारी:
अस्तित्वातील महाविद्यालये: ५७१
प्रवेश क्षमता: ३०,०००
खुल्या प्रवर्गासाठी पात्रतेचे गुण: ५०%
आरक्षित प्रवर्गासाठी पात्रतेचे गुण: ४५%
नवीन प्रणाली कशी असेल?
नवीन धोरणानुसार, इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या इंटिग्रेटेड ‘बीएड’ अभ्यासक्रमात थेट प्रवेश मिळणार असून, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पदवीही मिळेल. त्याची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.
टीईटी परीक्षा अनिवार्यच राहणार
‘डीएड’ ऐवजी ‘बीएड’ सुरू झाला तरी शिक्षक भरतीसाठी पात्रता परीक्षा बंधनकारकच राहणार आहे. ‘टीईटी’च्या पेपर-एकद्वारे इयत्ता १ ते ५ साठी आणि पेपर-द्वारे इयत्ता ६ ते ८ साठी पात्रता मिळेल. उर्वरित वर्गांसाठी ‘टीएआयटी’ परीक्षा आवश्यक आहे. ही माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.