yuva MAharashtra बोल अंतरंगाचे - राजा सांगलीकर

बोल अंतरंगाचे - राजा सांगलीकर


| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु दि. ११ मे २०२५

तो एक वृद्ध. त्या दिवशी सकाळी तो झोपेतून नेहमीपेक्षा थोड्या उशीरा जागा झाला होता. दंत, मुखमार्जन आटोपून थोडे दुध पिऊन तो जवळच्या पार्कमध्ये नेहमीप्रमाणे फिरायला गेला. पार्कच्या मोकळ्या हवेत वृद्धाने कांही वेळ व्यायाम केला. पार्कमध्ये नेहमी येणाऱ्या एका-दोघांशी अवांतर गप्पा मारल्या. तासाभराच्या अंतराने पार्कमधून बाहेर पडून तो त्याच्या आवडत्या उडपी रेस्टारंटकडे चालू लागला. 

तो रेस्टॉरंटमध्ये येत असल्याचे पाहून रेस्टॉरंटच्या कॅश कौंटरवरील कॅशियरने नेहमीप्रमाणे त्याच्या आवडत्या फिल्टर कॉफीचे रू.२० किंमतीचे टोकन तयार ठेवले. तो वृद्ध रेस्टॉरंटमध्ये आला. पॅण्टच्या मागील खिशातून पैशाचे पाकीट काढले. त्यातील वीस रूपयाची नोट काढून कॅशियरला दिली. कॅशियरने दिलेले टोकन त्या वृद्धाने कॉफी सर्व्हिंग कौंटरवरील इसमाला दिले. 

स्टीलच्या ग्लासमध्ये दिलेली फिल्टर कॉफी घेऊन त्या वृद्धाने रेस्टॉरंटमधील एका टेबल-खुर्चीवर आपली बैठक जमवली, आणि कडक फिल्टर कॉफीचा तो आस्वाद घेऊ लागला. कांही वेळाने वृद्धाचे कॉफी पिणे आटोपले. रेस्टॉरंटच्या बाहेर पडून तो रस्त्यावर चालू लागला. 

रस्त्यावर १०-१२ पुरूष आणि स्त्रिया ड्रेनेज दुरुस्तीसाठी सिमेंटच्या जड विटा घण मारून फोडत होते. फोडलेल्या विटा वाहून नेत होते. रस्त्यावर सिमेंटची धूळ उडत होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांचे मालक, नोकर त्या कामगार लोकांपैकी कांहीजणांशी हुज्जत घालत होते. तिथून जाणारे पादचारी सिमेंटचे कण नाकात जाऊ नयेत यासाठी नाकाला रूमाल लावुन जात होते. 


त्या वृद्धानेही त्याच्या नाकाला रूमाल लावला. वन वे असला तरी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या दोन्ही बाजुने घुं s s घुं आवाज करत वेगाने येणा-या दुचाकी, कारवाल्यांचा अंदाज घेतला आणि रस्ता क्रॉस केला. रस्ता क्रॉसकरून फुटपाथवर आल्यावर फुटपाथवरील दुकानातील सामानाचे ठेवलेले अडथळे चुकवत वृद्ध पुढे चालु लागला. 

२५-३० पाऊले चालल्यावर वृद्धाला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला साडीची झोळी करून अडवलेली दिसली. वृद्धाने कुतूहलाने त्या झोळीत पाहिले. त्या झोळीत एक ६-७ महिन्याचे बाळ आरामात झोपले होते. त्याची आई रस्त्याच्या दुस-या बाजुला ड्रेनेज दुरूस्तीसाठीचे जे काम चालू होते तिथे काम करत होती. 


६-७ महिन्याच्या पोटच्या गोळ्याला झोळ्यात घालून रस्त्यावर शारीरिक कष्टाचे काम करुन, जीवन जगणाऱ्या त्या आईच्या दयनीय स्थितीची तुलना मनातल्या मनात वृद्धाने त्याच्या सुखवस्तु जीवनाशी केली. चांगली शारीरिक प्रकृती, राहायला थ्री बीचके फ्लॅट, चांगली आर्थिक स्थिती, घरी काळजी घेणारा मुलगा, सुन, प्रेमळ नातवंडे, दररोज मिळणारे सुग्रास चवदार अन्न, भारी किंमतीचे कपडे आणि असेच बरेच कांही त्याच्याजवळ असलेले वृद्धाला आठवले.

आपल्याला हे सर्व दिल्याबद्दल वृद्धाचे मन परमेश्वरा प्रति कृतज्ञतेने भरून गेले. 
रस्त्यावर उन्हातान्हात काम करणारे ते लोक, ६-७ महिन्याच्या आपल्या बालकाला झोळीत घालून पैशासाठी शारीरिक कष्ट करणारी ती स्त्री, आणि स्वतःची चांगली स्थिती हे सर्व आठवून वृद्धाने मनोमन कांही विचार केला. 

जवळच्या स्टेशनरी दुकानात जाऊन त्याने एक कागदी पाकिट खरेदी केले. पाकीटाचे पैसे दुकानदाराला देऊन झाल्यावर पैशाचे पाकिट लगेचच खिशात परत न ठेवता त्यातील कांही नोटा काढून त्यांने पाकिटात घातल्या. आता तो वृद्ध पुन्हा एकदा साडीची झोळी अडकवलेल्या त्या झाडाजवळ येऊन उभा राहिला. 

थोडा वेळ तिथे उभा राहून त्यांने जवळपासच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही, आपल्याकडे कोणी पाहात नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न आहे, हे पाहून त्या वृद्धाने ते पाकीट झोळीत हात घालून त्या बाळाच्या बाजुला ठेवले आणि तिथेच कांही वेळ गप्प उभा राहिला. कांही वेळाने तिथून चालता झाला. 

नेहमीप्रमाणे वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वन वे असुनही रस्त्याच्या दोन्ही बाजुने घुं s s घुं आवाज करत दुचाकी, मोटारी वेगाने जात होत्या. पादचारी जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करत होते. फुटपाथवरील सामानांचे अडथळे पार करत वाटचाल करत होते. सिमेंटच्या कणांनी आसमंत भरून गेला होता. रस्त्याच्या बाजुचे दुकानदार मनातल्या मनात कार्पोरेशनला शिव्या घालत कपाळावर आठ्ठ्यांचे जाळे पसरवून ड्रेनजचे काम संपण्याची वाट पाहात होते.

ड्रेनजचे काम करणारे स्त्री-पुरूष घाम पुसत सिमेंटच्या विटा फोडत होते, फोडलेल्या वीटा वाहुन नेत होते. जगाचे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते, आणि झाडाला अडवलेल्या साडीच्या झोळ्यात ते बाळ निरागसपणे आजुबाजूच्या जगाची दखल न घेता शांतपणे झोपले होते. 

आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण