| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ मे २०२५
राज्यातील शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या आणि सध्याच्या तातडीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लवकरच मंत्रालयात प्रधान सचिवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. सांगली शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाशी शनिवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केले.
यू. टी. जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन मंत्री गोरे यांच्याकडे सादर केले. या निवेदनात १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता आदेशाची अंमलबजावणी, २००१ ते २०१४ दरम्यानच्या वस्ती शाळा शिक्षकांच्या सेवांचा स्वीकार, मुख्यालयी वास्तव्यासंबंधीची सवलत, गुणवत्तेचे समान उपक्रम राज्यभर राबविणे, तसेच गेल्या दहा वर्षांपासून रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखांच्या पदांची सेवा ज्येष्ठतेनुसार भरती यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे, प्राथमिक शिक्षकांना शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांसारख्या पदांमध्ये सरळसेवेच्या संधी पूर्वीप्रमाणे उपलब्ध करून देणे, व शिक्षणेतर जबाबदाऱ्यांमधून शिक्षकांची मुक्तता करणे यावरही चर्चा झाली.
या सर्व मागण्यांचा सखोल आढावा घेऊन, लवकरच निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्यात येईल, असे मंत्री गोरे यांनी सांगितले. शिष्टमंडळात सुनील आदलिंगे, नानासो झुरे, सचिन खरमाटे, मधुकर बनसोडे यांचा सहभाग होता.