yuva MAharashtra "विरोधात बसायला आमदार तयार नाहीत" – शरद पवारांची खंत; महाविकास आघाडीपुढे प्रश्नचिन्ह ?

"विरोधात बसायला आमदार तयार नाहीत" – शरद पवारांची खंत; महाविकास आघाडीपुढे प्रश्नचिन्ह ?

फोटो सौजन्य : दै. सकाळ  

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ मे २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये आताही मतभेद उफाळून येत आहेत. काही आमदार सत्तेच्या दिशेने झुकत असून, अजित पवारांसोबत जाण्याची इच्छाही काहींनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी, उद्या दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तरी आश्चर्य वाटू नये, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे एकत्र येण्याच्या शक्यतेवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुन्हा एकदा एक महत्त्वाचं विधान केलं आहे. सत्तेच्या बाहेर राहणं आमदारांना रुचत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी ही खंत बोलून दाखवली. त्यामुळे त्यांच्या गटातील काही आमदार सत्तेत सहभागी होण्यासाठी आतुर आहेत, हे स्पष्ट होत आहे. यामुळे महाविकास आघाडीचा पुढचा मार्ग काय असेल, हा प्रश्न उपस्थित होतो.


अजित पवारांची भूमिका काय?

दोन राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाची सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. ‘NDTV मराठी’शी बोलताना त्यांनी, “विलिनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव समोर नाही,” असं ठामपणे सांगितलं. मात्र, शरद पवारांच्या गटातून होणाऱ्या संभाव्य गळतीमुळे हे विषय चर्चेत येत असल्याचंही ते म्हणाले. भविष्यातील गळती रोखण्यासाठीच शरद पवार अशा प्रकारची विधाने करत असावेत, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.

महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

महाविकास आघाडीचे भवितव्य सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आघाडी वाचवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ही त्यांची ठाकरे यांच्याशी पहिलीच भेट असणार आहे. ही भेट आघाडीच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.


दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांची पकड ढासळतेय का, असा सवाल उपस्थित होतो आहे. त्यामुळे आगामी रणनीती ठरवण्यासाठी या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.