yuva MAharashtra दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले !

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले !

फोटो सौजन्य : Wikimedia commons 

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ मे २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत पार पडणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काका-पुतण्याच्या राजकीय नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडत पहिल्यांदा भूमिका मांडली आहे.

शरद पवारांचं आधीचं वक्तव्य काय होतं ?

एका मुलाखतीदरम्यान अनौपचारिक संवादात शरद पवारांनी म्हटलं होतं की, “दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यायचे की नाही, हे पुढच्या पिढीने ठरवावं. मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही.” त्यानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. यावर आता अजित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.


अजित पवार काय म्हणाले ?

अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांसमोर बोलताना, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितलं की शरद पवारांच्या गटातून काही लोक बाहेर पडू शकतात, यामुळेच एकत्रीकरणाच्या चर्चेला तोंड फुटलं असावं.

शरद पवारांचं वक्तव्य गळती थांबवण्यासाठी ?

अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, शरद पवारांनी जे संकेत दिले, ते कदाचित त्यांच्या पक्षातील संभाव्य गळती रोखण्यासाठी असतील. त्यामुळे या चर्चेला फारसा अर्थ नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे.

सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नाही

मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी हे सर्व स्पष्टीकरण दिलं. सध्या दोन्ही गटांमध्ये वरिष्ठ पातळीवर कोणतीही औपचारिक चर्चा सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.