yuva MAharashtra श्री. शशिकांत राजोबा व श्री. एन. जे. पाटील यांची सहकार भारतीवर अभिनंदनीय निवड !

श्री. शशिकांत राजोबा व श्री. एन. जे. पाटील यांची सहकार भारतीवर अभिनंदनीय निवड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२५

देशांतील २९ राज्यातील ६०० हून अधिक जिल्ह्यातून सहकाराच्या शुद्धी, वृद्धी प्रमाणेच गुणात्मक व संख्यात्मक वृद्धीसाठी, शिक्षण, प्रशिक्षणासाठी, कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी गेल्या ४५ वर्षांहून अधिक कालापासून देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या 'सहकार भारती' या संस्थेच्या सांगली महानगरच्या अध्यक्षपदी सन २०२५ ते २०२८ या कालावधीकरता श्री. शशिकांत राजोबा यांची अभिनंदननीय निवड झाली आहे.

श्री. राजोबा हे २०१७ पासून सहकार भारती या संघटनेशी निगडित असून यापूर्वी प्रांतीय उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे महानगर अध्यक्षपदाचे दायित्व स्वीकारून ते सांगली जिल्हा पातळीवर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील १६००० नागरी पतसंस्थांची शिखर संस्था असणाऱ्या व महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मध्ये गेल्या आठ वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत असून सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सन्माननीय महासचिव या पदाचे दायित्व स्वीकारले आहे. पतसंस्थांच्या समस्या, प्रश्न, अडचणी निराकरणासाठी फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वात श्री. राजोबा हे कार्यरत असून, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन, वीराचार्य पतसंस्था सांगली अशा सहकारातील विविध संस्थांचे ते मार्गदर्शक संचालक म्हणून कार्यरत आहेत.

तसेच संस्थेचे संचालक व वीर सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते मा. श्री. एन जे पाटील यांची सहकार भारतीच्या सांगली महानगरच्या पतसंस्था प्रकोष्ठपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. राजोबा सर हे जिल्हा व राज्य पातळीवरील संचालक म्हणून कर्तव्य भावनेने वैशिष्ट्यपूर्ण कार्य संस्कृतीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानास्वरूप त्यांची सहकार भारती सांगली महानगरच्या अध्यक्षपदावर सन्माननीय निवड झाली आहे. ही निवड एका अर्थाने त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यकर्तृत्वावर शिक्कामोर्तब होण्याप्रमाणेच त्यांच्या कार्याला पदाचे कोदणं लाभल्याचे दिसून येते.


सहकार संक्रमण काळात पतसंस्था समोरील आव्हाने, आवर्तने याला सक्षमपणे सामोरे जात सहकार क्षेत्रात विविध पदाच्या माध्यमातून हे शिवधनुष्य पेलण्याची, या पदाला न्याय देण्याची कामगिरी पराकोटीच्या कर्तव्य भावनेने, मनोभावे श्रम, समय, सेवेच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक ते आज पार पाडीत असून प्रगतीक सहकाराच्या विचारधारेची कास धरीत, सहकाराची, समृद्ध परंपरा जतन करीत, 'सहकारीता सत्फलाय ' या संकल्पनेतून समाजऋण फेडण्याचे सहकार हे सक्षम साधन समजून सहकार साधना निरंतर ठेवत विधायक अर्थकारणाबरोबरच सजग समाजकारणाचा एक आदर्शवत मौलिक वस्तूपाठ अन्य संस्था समोर घालून दिल्याचे वास्तव म्हणावे लागेल. 

सहकार भारतीचे प्रदेश संघटन प्रमुख शरद जाधव, सहकार भारतीचे प्रदेश कोषाध्यक्ष व सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे, विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप, सुमंत महाजन, महेश्वर हिंगमिरे, सुभाषचंद्र मालाणी यांच्या बैठकीमध्ये ही नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. या दोघांच्या अभिनंदनीय निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.