| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२५
तरुणांमध्ये वाढणाऱ्या नशेच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस आता सक्रीय झाले आहेत. शहर आणि परिसरातील एकूण 59 ठिकाणे – जेथे अंधाराचा फायदा घेऊन नशा व गैरप्रवृत्ती चालायच्या – ओळखून त्यावर पोलिसांची लक्षवेधी नजर राहणार आहे. या ‘डार्क स्पॉट्स’वर बीट मार्शलना नियमित भेटी देण्याचे आदेश दिले गेले असून, कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून महापालिकेला स्ट्रीट लाइट बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसेच काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचाही प्रस्ताव आहे. अंधार हटवून सुरक्षितता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नशेमुक्तीसाठी ठोस कार्ययोजना आखली आहे. याअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलीस दलाने संयुक्त कारवाईला सुरुवात केली असून, एमडी ड्रग्ज, नशेची इंजेक्शन्स, गांजा, व गोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली असून, माहिती पुरवणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सदर मोहिमेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटवणे आणि तरुणाईला व्यसनांच्या दलदलीतून बाहेर काढणे हा दुहेरी उद्देश साधला जात आहे. दर सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीचा आढावा घेतला जातो.
विश्रामबाग, संजयनगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 34 महत्वाचे डार्क स्पॉट्स शोधून काढले गेले आहेत. उर्वरित ठिकाणीही हे काम सुरू आहे. पोलिसांच्या सततच्या गस्तीद्वारे खुले भूखंड, मोकळी मैदाने अशा ठिकाणी होणाऱ्या नशाखोरीला चाप बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
प्रमुख उपाययोजना :
रोज सायंकाळी 7 ते रात्री 1 दरम्यान विशेष गस्त
सांगली व मिरजमध्ये प्रत्येकी दोन गस्त पथकांची नियुक्ती
स्ट्रीट लाइट व सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षिततेचा वाढवलेला उपाय
स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य घेण्याचे निर्देश
ठळक 'डार्क स्पॉट्स':
सांगली शहर पोलीस ठाणे हद्द
वसंतदादा समाधी व वॉटर हाऊस, अमरधाम स्मशानभूमीजवळ, सांगलीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधारा, सिद्धार्थ बुद्धविहार परिसर, मुजावर प्लॉट बसस्थानकाजवळ, अल्-अमिन शाळेजवळील परिसर श्यामरावनगर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलेज परिसर, कार्निव्हल हॉटेलजवळ काळी वाट, शामरावनगर, स्वामी समर्थ घाट, कृष्णा घाट, गणेश मार्केट, आंबेडकर स्टेडियम, पन्नास फुटी रोड गादी कारखाना परिसर, कोल्हापूर रस्ता टी जंक्शन, हरिपूर रस्ता लिंगायत समाज स्मशानभूमी. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्द – भीम कट्टा, महावीर ब्रिज, राममंदिर, ओव्हरसीअर कॉलनी, तक्षशीला रोड, रेल्वे स्टेशन परिसर, हसनी आश्रम, कुंभार मळा, विजयनगर, मार्केटयार्ड कब्रस्तान परिसर, विलिंग्डन कॉलेज मैदान, मैत्रेय बिल्डिंग वान्लेसवाडी.
संजयनगर पोलीस ठाणे हद्द
संपत चौक परिसर, माधवनगर स्मशानभूमी, लक्ष्मी थिएटर परिसर, राम जानकी मंदिर परिसर संजयनगर, वसंतनगर मैदान परिसर, नवभारत हायस्कूल मैदान, आयटीआय कॉलेज ते पाईप कारखाना परिसर, रेल्वे स्टेशन रोड ते म्हसोबा मंदिर परिसर, ऊर्मिलानगर विहीर, यशवंतनगर पाण्याच्या टॉकिजजवळील मोकळे मैदान.
पोलीस आणि प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील नशेच्या अड्ड्यांवर लवकरच नियंत्रण येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.