yuva MAharashtra नामदेव समाजोन्नती परिषद सांगली महापालिका शहर शाखा व महिला कार्यकारिणीच्या संयुक्त विद्यमाने चैत्र मंगळागौरीचे निमित्ताने हळदीकुंकू !

नामदेव समाजोन्नती परिषद सांगली महापालिका शहर शाखा व महिला कार्यकारिणीच्या संयुक्त विद्यमाने चैत्र मंगळागौरीचे निमित्ताने हळदीकुंकू !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ एप्रिल २०२५

नामदेव समाजोन्नती परिषद सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका शहर शाखा व महिला कार्यकारिणीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र मंगळागौरीचे निमित्ताने हळदीकुंकू समारंभ सोमवार दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सांगली विश्रामबाग येथील दांडेकर हॉलमध्ये बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाने व आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी महिलां कार्यकारिणीच्या नूतन उपाध्यक्षा सौ.स्वाती मुळे, सौ.अनिता फुटाणे, सौ.रुपा गोंदकर, सौ.प्रतिभा पिसे, सौ.शारदा कोकणे व सौ.वासंती गाणबावले यांचा सत्कार करणेत आला.

श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक ना.स.प.शहर शाखेचे सचिव श्री.धनंजय होमकर यांनी केले, त्यांनी प्रथम सर्व उपस्थित महिला भगिनींचे अभिनंदन केले. त्यांनी ना. स. प. शहर शाखेच्या स्थापनेपासूनचा थोडक्यात आढावा घेतला व शिंपी समाजासाठी व महिलांसाठी सामाजिक कार्यात मदत करणेचे आश्वासन दिले. 


ना. स. प. ही संघटना शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी कशी कार्य करीत आली आहे व करत आहे. यावेळी आवर्जून ना.स.प.शहर शाखेचे माजी अध्यक्ष श्री.अविनाश पोरे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली व तेच कार्य पुढे आजच्या ना.स.प.शहर शाखेच्या अध्यक्ष प्रा.डी.जी.धट यांनी चालविले आहे याचा उल्लेख केला. त्यांना इतर पदाधिकारी यांनी सुध्दा चांगल्याप्रकारे साथ दिली आहे. 


महिला उपाध्यक्षांपैकी सौ.स्वाती मुळे यांनी त्यांच्या मनोगतात महिलांचे प्रथम आभार मानले, ना.स.प.शहर शाखेच्या सहकार्याने आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करु शकलो. त्यांनी महिला वर्गांसाठी महिला उद्योजिका साठी लघु उद्योगाबाबत माहिती व संधी उपलब्ध करून दिली जाईल व त्यासाठी महिलांनी वैयक्तिक माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. 

त्यानंतर सौ.अनिता फुटाणे यांनीही ना.स.प.शहर शाखेने महिलांच्या साठी हे स्टेज उपलब्ध करून दिले, त्याबद्दल आभार मानले. महिलांच्या उपस्थितीबद्दल खूप समाधान व्यक्त केले व यापुढेही महिलांनी असेच बहूसंख्येने एकत्र येऊन कार्यक्रम करावा अशी इच्छा व्यक्त केली.


सौ.शारदाताई कोकणे यांनीही त्यांचे मनोगतात ना.स.प.च्या कार्याचा उल्लेख केला. पंढरपूरातील नामदेव पायरी व नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी केलेल्या व करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल ना.स.प.चे माजी केंद्रीय अध्यक्ष कै.सुधीरदादा पिसे व आताचे अध्यक्ष श्री.संजय नेवासकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. 

या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य सौ.शारदाताई कोकणे व सौ.अनुश्री मयूर पतंगे यांनी केले. सौ.कोकणे वहिनी ह्या धान्य व्यापारी असून सौ.अनुश्री पतंगे यांनी नॅशनल व इंटरनॅशनल ब्युटीपार्लरचा कोर्स पूर्ण केला असून त्या ब्युटी पार्लरसाठी Academy स्थापन करणार आहेत. या दोघींचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक महिलांनी सहकार्य केले. सौ. सोनाली रेळेकर, सौ.हेमा मुळे, अश्र्विनी रासकर यांनी सुंदर रांगोळी काढून महिलांचे लक्ष वेधून घेतले. सर्व महिलांनी फणी गेम्स मध्ये भाग घेतला. यामध्ये वयस्कर महिलांचा सहभागही वाखाणण्याजोगा होता. फणी गेम्स चे नियोजन सौ.स्वाती मुळे, सुप्रिया बोंगाळे, सौ.रुपाली गुजर, सौ.भांबुरे, सौ.रसिका राहूल रेळेकर इत्यादीनी केले, तसेच चैत्रगौरी सजावट सौ.स्वाती मिरजकर यांनी खूप छान केली होती. तसेच सांगली मिरजेतील बहुसंख्य महिलांनी उत्साहाने व आनंदाने सहभागी झाले. नेहमी प्रमाणे मिरजेच्या सौ.माधुरी चोपडे यांनी उत्तमरितीने सूत्रसंचलन केले, त्यांचाही सत्कार करण्यात आला.   

या कार्यक्रमासाठी प्रा.डी.जी.धटसर, अविनाश पोरे, किरण कोकणे, शरद फुटाणे, गणेश मिरजकर, अजय गुजर, रविकांत वायचळ इत्यादी अनेक पदाधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शन सौ.सुप्रिया बोंगाळे यांनी मानताना उपस्थित सर्व महिलां, सूत्रसंचलन करणारे सौ.माधुरी चोपडे, ना.स.प.पदाधिकारी, दांडेकर हॉलचे व्यवस्थापक इत्यादी सर्वांचे आभार मानले. ना.स.प.ही संघटना खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना आहे, यांची प्रचीती आली.