yuva MAharashtra शिवसेनेचा महिलांना मजबूत नेतृत्व देण्यावर भर – डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसेनेचा महिलांना मजबूत नेतृत्व देण्यावर भर – डॉ. नीलम गोऱ्हे

फोटो सौजन्य  - दै. पुढारी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ एप्रिल २०२५

सांगली जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीच्यावतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या मेळाव्यास जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. डॉ. गोऱ्हे यांनी महिला कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करत त्यांना संघटनात्मक बांधिलकी, आरोग्य, सन्मान आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर मार्गदर्शन केले.

“महिलांशी दिलेले वचन आमचं कर्तव्य आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी 'लाडकी बहिण सन्मान योजना' आणि तिच्या माध्यमातून चालवले जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. २१०० रुपयांच्या अनुदानाच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या बचतगटांना सहकार्य करणाऱ्या बँकांची यादी महिला कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी सुचवले.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या योगदानाचा उल्लेख करत सांगितले की, “शिवसेना ही आपलीच आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ठसले पाहिजे.”

महिलांच्या आरोग्याची काळजी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाचे आवाहन !

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांची माहिती देताना त्यांनी हिमोग्लोबिन, कॅल्शियम, आयर्न यांसारख्या तपासण्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. गर्भाशयाच्या आरोग्याविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी गटातील महिलांना पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे यासाठी तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


सभासद नोंदणीसाठी विशेष प्रेरणा !

"प्रत्येक भगिनीने किमान २० नवीन सभासद नोंदवावेत," असे आवाहन करत त्यांनी महिलांना संघटनेत सक्रीय सहभाग घेण्यास उद्युक्त केले. यामुळे पक्षाची ताकद वाढून स्थानिक नेतृत्व घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे स्वागत सांगली जिल्हा संपर्कप्रमुख सुनीता ताई मोरे, रुक्मिणी आंबीगेर, ज्योती दांडेकर, अर्चना माळी, राणी कमलाकर, मनीषा पाटील आणि आशा पोतदार यांनी केले. प्रास्ताविक सुनीता ताई मोरे यांनी केले, तर जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, माजी जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील व संपर्कप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी आपले विचार मांडले.

या कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांनी शिवसेना पक्षप्रवेश केला, ज्यामुळे सांगलीतील महिला संघटनेला अधिक बळकटी मिळाल्याचे दिसून आले.